जेलमध्ये माझे जेवण उंदीर-चिचंद्रया खायच्या! एक गलेलठ्ठ उंदीर म्हणायचा 'मी पुन्हा येईल'
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची डायरी ऑफ ए होममिनिस्टर आत्मकथा लवकरच येत आहे. या आत्मकथेत अनि देशमुख यांनी तुरुगातील काही किस्से लिहिले असून त्यातून तुरुगात उंदीर, चिचुंद्रयांचा किती त्रास होता हेही सांगितले आहे.
अनिल देशमुख जेव्हा तुरुगात होते तेव्हा त्यांचे जेवण सेलमध्ये उंदीर-चिचंद्रया खायच्या त्यामुळे कित्येकदा माझ्यावर उपाशी झोपण्याची पाळीही आली असं म्हटलं आहे. 'तुरुगात माझे जेवण उंदीर-चिचंद्रया खायच्या, कितीही दूर हाकलायचा प्रयत्न केला, त्याची ती नजर सांगायची 'मी पुन्हा येईन ! असं म्हणत त्यांनी आपल्या आत्मकथेत 'टरबुजा' प्रकरणाचे एक पान एक्सवर पोस्ट केले आहे.
अनिल देशमुखांनी पोस्टमध्ये म्हटले की,
'तुरुगात अनेकांना घरचं जेवण दिलं जात असे. मात्र मला घरचं जेवण द्यायला न्यायालयाची परवानगी नव्हती, म्हणून मला तुरुगतालं जेवणच दिलं जायचं. तुरुगातील जेवण कसं असतं याचा अंदाज वाचक लावू शकतात; मात्र त्यापेक्षाही तुरुगातील जेवण कितपत सुरक्षित आहे, याची सतत धाकधूक असायची. संपूर्ण तुरुगात आणि माझ्याही सेलमध्ये उंदीर- चिचंद्रयांची अगदी भाऊगर्दीच होती. कित्येकदा तर असं व्हायचं की जेवण यायचं आणि मला जेवायला थोडा जरी उशीर झाला, तर तोवर उंदीर-चिचुंद्रया त्यावर तुटून पडलेल्या असायच्या. यामुळे कित्येकदा माझ्यावर उपाशी झोपण्याची पाळीही आली. "
"रविवारी आणि सरकारी सुट्टीच्या दिवशी तर जेवणाची परिस्थिती आणखीच खराब असायची; कारण रविवारी दुपारी 12 वाजता सेलचे दरवाजे जे बंद व्हायचे, ते थेट दुसऱ्या दिवशी 12 वाजता उघडायचे. म्हणजेच रविवारी दुपारी 12 वाजता जे जेवण मिळायचं त्यावरच दुसऱ्या दिवशी जेवण मिळेपर्यंतची वेळ मारून न्यावी लागायची. त्याशिवाय रविवारी दुपारी आलेलं जेवण उरवून उंदीर- चिचुंद्रयांपासून त्याचं रक्षण करण्यासाठी ते बादलीच्या वर ठेवून त्याची राखण करत बसावं लागायचं ते वेगळंच !"'तसे तर तुरुगात खूपच उंदीर आणि चिंचुद्या होत्या, मात्र त्यामध्ये एक उंदीर एकदम वेगळा होता. अगदी गलेलठ्ठ. साहजिकच त्यामुळे तुरुगातील सगळे त्याला 'टरबूजा' म्हणायचे. त्याला कितीही दूर हाकलायचा प्रयत्न केला, तरी तो अशा काही नजरेने आपल्याकडे बघायचा की जणूकाही त्याची ती नजर सांगत असायची 'मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन...!' " असेही अनिल देशमुख यांनी पोस्ट केलेल्या पुस्तकातील पानावरील मजकुरात म्हटले आहे.
अनिल देशमुख यांनी पुस्तकाचे पान आणि काही मजकूरही पोस्ट केला आहे. "महाराष्ट्राच्या राजकारणातील टरबूज्या लवकरच तुम्हाला समजेल मी कोणाबद्दल बोलतोय ! माझी थरारक आणि अंगावर काटा आणणारी आत्मकथा 'डायरी ऑफ ए होम मिनिस्टर' मधील 16 आणि 20 नंबरच्या प्रकरणातील काही उतारे तुमच्याशी शेअर करतोय. ही फक्त एक झलक आहे, या पुस्तकात टरबूजाच्या विकृत राजकारणाचे खरे रूप जनतेसमोर आणणारे अनेक धक्कादायक खुलासे आहेत." असेही त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.