Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमुळे आर्थिक विकासाला गती- ⁠केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमुळे आर्थिक विकासाला गती - ⁠केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी 


- दहिवडी मायणी विटा रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न
- नवीन मुंबई पुणे बंगळुरू महामार्ग बांधणार
- मुंबई ते बंगळुरू 800 किलोमीटरचे अंतर आठ तासात पार करता येणार
- राष्ट्रीय महामार्गाची सांगली जिल्ह्यातील लांबी जवळपास 600 कि. मी.  
- ⁠सांगली तासगाव बाह्य वळणास मंजुरी

सांगली :-  दहिवडी मायणी विटा रस्त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाची सांगली जिल्ह्यातील लांबी जवळपास ६००कि. मी. पर्यंत पोहोचली आहे. ६० किलोमीटर लांबीच्या  173 कोटी रुपयांच्या सांगली -तासगाव बाह्य वळणासही मंजुरी देण्यात आली आहे. त्याचे भुसंपादनाचे काम सुरु झाले आहे. सर्वांनी सहकार्य केल्यास रस्त्याचे कामही लवकरच सुरु होईल. या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमुळे आर्थिक विकासाला गती मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.
   
राष्ट्रीय महामार्ग क्र. १६० दहिवडी – मायणी - विटा  कि.मी. ३४०/२५० ते ३९२/९५० या रस्त्याचे काँक्रीट दुपदरीकरण, चौपदरीकरणासह पुनर्बांधणी व दर्जोन्नतीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन व कोनशीला अनावरण  गडकरी यांच्या हस्ते विटा येथे करण्यात आले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, खासदार विशाल पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, माजी आमदार दिलीप येळगावकर उपस्थित होते.

रस्त्याचे भूमिपूजन झाल्याचे जाहीर करून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले, नवीन मुंबई - पुणे - बंगळुरू महामार्ग बांधायचे ठरवले आहे. या महामार्गामुळे मुंबई ते बंगळुरू हे जवळपास ८०० किलोमीटरचे अंतर आठ तासात पार करता येऊ शकेल. या महामार्गावर ५ ठिकाणी विमान उतरण्याची सोय करण्यात आली आहे. या महामार्गाची सांगली जिल्ह्यात ७४ किलोमीटर लांबी आहे. या नवीन महामार्गामुळे दुष्काळी भागाच्या आर्थिक विकासासाठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

आपण केंद्रीय जलसंधारण मंत्री असताना टेंभू, म्हैसाळ योजनाना मंजुरी देण्याची संधी मिळाल्याचे सांगून या उपसा सिंचन योजनांमुळे दुष्काळी भागाचा कायापालट होऊन हिरवं शिवार फुलल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.  प्रारंभी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते रस्ते कामाच्या कोनशीलेचे अनावरण करण्यात आले. महामार्ग प्रकल्प माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात आली. प्रारंभी मंत्री महोदयांनी महामार्ग नकाशा पाहणी केली. 

भूमिपूजन केलेल्या महामार्गाची माहिती पुढीलप्रमाणे - 
 
राष्ट्रीय महामार्ग क्र. १६० दहिवडी - मायणी – विटा हा प्रकल्प दहिवडी बसस्थानक येथे सुरू होऊन विटा नगरपरिषद हद्द येथे समाप्त होतो. याची एकूण लांबी ५२.७० कि.मी. आहे. यामुळे बारामती - फलटण - विटा - तासगाव - सांगली ही शहरे जोडली जाणार आहेत. संपूर्ण लांबी दुपदरीकरण / चौपदरीकरण व काँक्रिटीकरण करण्यात येणार असून यासाठी ६३१ कोटी ७६ लाख रूपये रक्कम मंजूर करण्यात आली आहे. कामाचा कालावधी २ वर्षे आहे. ६;४३५८ हेक्टर इतके भूसंपादन करण्यात येत असून यासाठी ३ कोटी ९० लाख रूपये रक्कम खर्च होणार आहे. या कामाची तांत्रिक निविदा २७ सप्टेंबर  रोजी उघडण्यात आली आहे.
या प्रकल्पामुळे राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणारे लोक, स्थानिक लोक तसेच वाहतूक, रहदारी या सर्वांची सुरक्षितता वाढणार आहे आणि अपघाताच्या प्रमाणात घट होणार आहे. प्रवास सुखकर व आरामदायी होणार आहे. हा रस्ता सातारा व सांगली जिल्ह्याला तसेच इतर राज्यमार्गांना जोडणारा दुवा आहे. हा रस्ता NH 166E ला जोडला जात असून तो कोकण ते कर्नाटक राज्याला जोडला जातो. या राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रीटीकरण होऊन या विस्तारामुळे सातारा, सांगली, तासगाव, विटा हा कृषी पट्टा आणि औद्योगिक क्षेत्राचा संभाव्य विकास होईल. तसेच येथील वाहनांची गर्दी कमी होईल त्यामुळे प्रदूषण कमी होईल, इंधनाचा वापर व वेळेची बचत होईल.

या रस्त्यामुळे शिर्डी, शनी शिंगणापूर, शिखर शिंगणापूर यासारख्या धार्मिक स्थळांशी संपर्क सुलभ होईल, ज्यामुळे धार्मिक पर्यटन उपक्रमामध्ये वाढ होईल आणि संबंधित क्षेत्रांचा विकास होईल. त्याचबरोबर ऊस, हळद आणि द्राक्षे वाहतुकीस लाभदायक ठरणार आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या सभोवतालच्या परिसराच्या, शहरांच्या सर्वांगीण विकास व रोजगार निर्मितीस सहाय्यक ठरणार आहे.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.