9 दिवस मिळणार नाही चिकन, मटण! थेट विक्रीवरच बंदी, दारूचं काय?
नवी दिल्ली : आता फक्त काही तास, मग देशभरात गुंजेल 'ए हालो...', सगळीकडे मोठ्या उत्साहात दांडिया खेळल्या जातील, गरबा खेळला जाईल, घरोघरी घटस्थापना होईल. अनेकजण नवरात्रीचे 9 दिवस उपवास पाळतात. या पार्श्वभूमीवर एका शहरात अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
धार्मिक मान्यतेनुसार, नवरात्रीचे 9 दिवस देवी दुर्गा पृथ्वीवर राहायला येते. त्यामुळे या काळात देवीच्या 9 रूपांची मनोभावे पूजा केली जाते. यंदा 22 जानेवारीला अयोध्येच्या भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यावेळी न भूतो न भविष्यति असा ऐतिहासिक सोहळा संपूर्ण जगाने पाहिला.
याच अयोध्यानगरीत नवरात्रीच्या दिवसांत मांसाहार विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखालील उत्तर प्रदेश सरकारनं हा निर्णय घेतला आहे. अयोध्या जिल्हा प्रशासनानं नवरात्रोत्सवादरम्यान 3 ऑक्टोबरपासून 11 ऑक्टोबरपर्यंत सर्व प्रकारच्या मांसविक्रीवर आणि ताटात मांस वाढण्यावर बंदी घातली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येच्या अन्नसुरक्षा व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, नवरात्रोत्सवात अयोध्येत सर्व प्रकारच्या मांस खरेदीवर बंदी असणार आहे. यामध्ये मांसाहार विक्री करणाऱ्या हॉटेल आणि रेस्टॉरंटचाही समावेश असेल. विशेष म्हणजे जर सामान्य जनतेला नवरात्रोत्सवात अयोध्येत कुठेही मांसविक्री झाल्याचं आढळलं तर त्याबाबत तक्रार करण्यासाठी क्रमांक जारी करण्यात आले आहेत. त्यानंतर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं आदेशात म्हटलं आहे.दरम्यान, एका अहवालानुसार, नवरात्रोत्सवात धार्मिक स्थळांजवळ दारूविक्रीवरही बंदी असणार आहे. तसंच इतर ठिकाणी काही ठराविक तासांसाठीच दारूविक्री केली जाईल. मात्र याबाबत कोणतेही अधिकृत आदेश समोर आलेले नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.