मोठा घोटाळा उघडकीस, सर्वसामान्यांचे ₹500 कोटी स्वाहा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण...
देशात ऑनलाइन फसवणुकीचे आणखी एक मोठे प्रकरण उघडकीस आले आहे. एका 30 वर्षीय व्यक्तीने सुमारे 30,000 लोकांची 500 कोटी रुपयांची फसवणूक केली. विशेष म्हणजे, या घोटाळ्यात अनेक हाय प्रोफाइल यूट्यूबर्स आणि बॉलिवूड सेलिब्रिटींचाही सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी कारवाई करत दिल्ली पोलिसांच्या सायबर सेल IFSO (इंटेलिजन्स
फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स) ने चेन्नईचा रहिवासी मास्टरमाइंड
शिवरामला अटक केली आहे.
घोटाळा कसा झाला?
आरोपी शिवरामने नोव्हेंबर 2016 मध्ये सवरुल्ला एक्सप्रेस प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली आणि फेब्रुवारी 2024 मध्ये HIBOX नावाचे ॲपही लॉन्च केले. HIBOX ॲपचा गुंतवणूक योजना म्हणून प्रचार करण्यात आला होता. यामध्ये दररोज 1 ते 5 टक्के, म्हणजेच महिन्यात 30 ते 90 टक्क्यापर्यंत व्याज देण्याचे आमिष दाखवण्यात आले. झटपट नफा मिळवण्याच्या हव्यासापोटी हजारो लोकांनी या ॲपमध्ये गुंतवणूक केली. सुरुवातीला ॲपने परतावा देण्यास सुरुवात केली, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा अॅपवरील विश्वास वाढला. परंतु जुलै 2024 पासून तांत्रिक त्रुटी आणि कायदेशीर वैधतेचे कारण देत पेमेंट थांबवले.
या सेलिब्रिटींची नावे पुढे
या घोटाळ्यात यूट्यूबर एल्विश यादव, लक्ष्य चौधरी, अभिषेक मल्हान, कॉमेडियन भारती सिंग आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांसारख्या मोठ्या सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत. या सर्वांनी HIBOX ॲपची जाहिरात केली होती. पोलिसांनी या सर्वांना 3 ऑक्टोबर रोजी नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे.
बँक खाते जप्त
पोलिस उपायुक्त (IFSO स्पेशल सेल) हेमंत तिवारी यांनी सांगितले की, हायबॉक्स अॅप नियोजित घोटाळ्याच्या केंद्रस्थानी होते. IFSO युनिटने शिवरामच्या चार बँक खात्यांमधील 18 कोटी रुपये जप्त केले आहेत. याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) नोटीसही पाठवण्यात येणार आहे. या प्रकरणात, Easebuzz आणि Phonepe सारख्या पेमेंट गेटवे कंपन्यांच्या भूमिकेचाही पोलीस तपास करत आहेत. या कंपन्यांनी नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.