चित्रा वाघ, पोहरादेवीचे महंत आजच आमदारकीची शपथ घेणार? आचारसंहितेपूर्वी भाजपची राज्यपाल नियुक्त आमदारांची 3 नावं ठरली
मुंबई : राज्यातल्या विधानसभेसाठी मंगळवारी आचारसंहिता लागणार असल्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधीची तयारीही सुरू असल्याची माहिती आहे. भाजपकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि पोहरादेवीचे महंत बाबूसिंग महाराज यांची नावं राज्यपालांकडे पाठवण्यात आल्याची माहिती आहे.
हे नेते मंगळवारी सकाळीच आमदारकीची शपथही घेणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्यासोबत शिंदे गटातील दोन आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील दोन नेतेही आमदारकीची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मंगळवारी सकाळीच शपथविधी होणार
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी केवळ 7 जणांची नावं राज्यपालांकडे देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामध्ये भाजपला 3, राष्ट्रवादीला 2 आणि शिवसेनेला 2 जागा दिल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपकडून महामंत्री विक्रांत पाटील, चित्रा वाघ आणि पोहरादेवीचे महंत बाबूसिंग महाराज यांना संधी देण्यात येणार आल्याची माहिती आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्यासह आणखी एका नेत्याला संधी देण्यात येणार आहे. एबीपी माझाला सूत्रांनी ही माहिती दिलीय. उद्याच या संभाव्य आमदारांचा शपथविधी होण्याचीही शक्यता आहे.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायम
राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपदही पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडेच राहण्याची शक्यता आहे. रुपाली चाकणकर यांना त्या पदावर पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे.
बाबूसिंग महाराज यांना मुंबईला येण्याचे निर्देश
बंजारा समाजाचे महंत आणि पोहरादेवीचे पीठाधीश बाबूसिंग महाराज यांचं नाव या यादीत आहे. बाबूसिंग महाराज यांनी या बातमीची पुष्टी केली असून भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनद्वारे मुंबईला येण्याचा निरोप दिल्याची माहिती त्यांनी दिली. मंगळवारी 12 वाजेपर्यंत आपण मुंबईला पोहचणार असल्याचं महंत बाबूसिंग महाराज यांनी एबीपी माझाला सांगितलं.
दिल्लीतील बैठक आटोपली, भाजप नेते मुंबईकडे रवाना
भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील नेत्यांची सोमवारी महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये पक्षाचे सर्व कोअर गटाचे नेते उपस्थित होते. त्यानंतर पुन्हा अमित शाह, जेपी नड्डा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दरम्यान बैठक झाली. तिसरी बैठक देवेंद्र फडणवीस आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, आशिष शेलार यांच्या दरम्यान झाली. या सर्व बैठकीनंतर भारतीय जनता पक्षाचे नेते मुंबईकडे रवाना झाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.