"24 तासांत तुझं फालतू नेटवर्क संपवून टाकीन..."; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईला अपक्ष खासदाराचं खुलं आव्हान
महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आणि तीन वेळा आमदार राहिलेले बाबा सिद्दीकी यांची त्यांच्याच मतदारसंघात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
सिद्दिकी यांच्या हत्येमागे बिश्नोई गँग असल्याचा दावा एका फेसबुक पोस्टमधून करण्यात आला आहे. याची सखोल चौकशी सध्या सुरू आहे. गोळ्या घालणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. तर, तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या निर्दयी हत्येचा निषेध संपूर्ण देशभरातून करण्यात येतोय. तसेच, एवढ्या मोठ्या नेत्याची हत्या होते, मग राज्यातील जनता किती सुरक्षित? अशी टीका विरोधकांनी महायुती सरकावर केली आहे. दरम्यान, या सर्व गदारोळात थेट गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला एका अपक्ष खासदारानं खुलं आव्हान दिलं आहे.
बिहारचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला खुलं आव्हान दिलं आहे. कायद्यानं परवानगी दिली तर, लॉरेन्स बिश्नोई सारख्या फालतू किंमतशून्य गँगस्टरचं नेटवर्क 24 तासांत उद्ध्वस्त करू, असं पप्पू यादव म्हणाले आहेत.
पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी ट्विटरवर लिहिलेल्या पोस्टमध्ये वादग्रस्त शब्दांचा वापर केला आहे. पप्पू यादव यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, देश असो की &^%#@ चं सैन्य असो. एक गुन्हेगार तुरुंगात बसून लोकांना आव्हान देतोय, लोकांना मारतोय, परंतु सर्वजण फक्त पाहतायत. पुढे पप्पू यादव म्हणाले की, लॉरेन्स बिश्नोईनं कधी मूसवालाला मारलं, कधी करणी सेनेच्या प्रमुखाला मारलं आणि आता दिग्गज राजकारण्याला मारलं.
पप्पू यादव यांनी लॉरेन्स बिश्नोईला फालतू गँगस्टर म्हटलं आहे. याच पोस्टमध्ये त्यांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला आव्हान देखील दिलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "जर कायदा परवानगी देत असेल, तर मी 24 तासांच्या आत लॉरेन्स बिश्नोईसारख्या छोट्या-छोट्या गुन्हेगाराचं संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करीन..."
यापूर्वीही पप्पू यादव यांनी केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी बाबा सिद्दिकी यांचं वर्णन बिहारचे सुपुत्र असं केलं होतं. दरम्यान, बाबा सिद्दीकी हे मूळचे बिहारचे होते. त्यानंतर मुंबईत येऊन त्यांनी राजकारणात प्रवेश केला. पुढे त्यांनी लिहिलं होतं की, Y श्रेणीची सिक्योरिटीमध्ये माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची झालेली हत्या म्हणजे, महाराष्ट्रातील महाजंगलराजाचा लाजिरवाणा पुरावा असल्याचं पप्पू यादव यांनी लिहिलं होतं. बिहारचे सुपुत्र बाबा सिद्दीकी यांची हत्या अत्यंत दुःखद आहे. भाजपचे आघाडी सरकार आपल्या पक्षातील अशा प्रभावशाली नेत्यांना संरक्षण देऊ शकत नसेल, तर सर्वसामान्यांचे काय होणार?, असं पप्पू यादव म्हणाले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.