बदलापूरच्या शाळेतील ट्र्स्टींवर चाईल्ड पॉर्नोग्राफीचा आरोप, अक्षय शिंदेला IPS मीरा बोरवणकरांना भेटण्याची इच्छा?
मुंबई: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी संध्याकाळी मुंब्रा बायपास रोडवर पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. अक्षयने एका पोलीस कर्मचाऱ्याची रिव्हॉल्व्हर हिसकावून पोलिसांवर हल्ला केला.
त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याच्या डोक्यात गोळी घुसून तो जागीच ठार झाला होता. मात्र, यानंतर बदलापूरच्या ज्या शाळेत अक्षयने लहान मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे, त्या शाळेच्या विश्वस्त मंडळाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत केतन तिरोडकर यांनी अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. त्यानुसार बदलापूरच्या शाळेतील विश्वस्तांवर मानवी तस्करी आणि चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभागी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच बदलापूरमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा गुन्हा नोंद झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या शाळेतून अन्य एक मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.याप्रकरणात काही बड्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे याप्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात लवकरच या जनहित याचिकेवर सुनावणी होणार आहे.
अक्षय शिंदेला आयपीएस मीरा बोरवणकारांना भेटण्याची इच्छा?
केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेतील आणखी एक मुद्दा अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. तो म्हणजे अक्षय शिंदे याने तुरुंगात असताना आपल्याला आयपीएस मीरा बोरवणकर यांना भेटण्याची इच्छा पोलिसांकडे बोलून दाखवली होती. आरोपी हायकोर्टाने स्थापन केलेल्या विशेष समितीपुढे गेला तर प्रकरण वेगळ्याच वळणार जाईल, या भीतीने त्याचा एन्काऊंटर झाल्याचा गंभीर आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. ट्रस्टी आणि शाळेतून सीसीटीव्ही गायब करणारा कर्मचारी अद्याप फरार असल्यानं ठाणे पोलीस आणि एसआयटीच्या कारभारावरही सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. मात्र, आता याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सुपूर्द केला जाण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.