सावधान! तुम्हालाही असा मॅसेज आलाय? मग वेळीच सतर्क व्हा; पोलीस आयुक्तांनी केलं अलर्ट
मागील काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. सायबर चोरटे मॅसेज तसेच कॉल करून नागरिकांची आर्थिक फसवणूक करीत आहेत. यासंदर्भात पोलिसांकडे अनेक तक्रारी देखील प्राप्त झाल्या आहेत.
अशातच मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी एक परिपत्रक काढलं आहे. फेक मॅसेज आणि नोटीसी आल्यास मुंबईकरांनी सतर्क राहावं, असं आवाहन त्यांनी परिपत्रकातून केलं आहे. सध्या सोशल मिडिया वापरकर्त्यांना एक फेक मॅसेज येत आहे. या मॅसेजमध्ये तुम्हाला लवकरच अटक होणार, असा आशयाचा मजकूर आहे. मुंबई पोलीस आयुक्तांच्या नावाने ही नोटीस पाठवण्यात येत आहे. अनेकांना ही नोटीस प्राप्त झाल्याची माहिती आहे. तुम्हालाही अशा प्रकारची नोटीस आल्यास त्याला उत्तर देऊ नका, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केलं आहे.
अटकेची नोटीस, ईमेल, फोन कॉल किंवा मेसेजेस आल्यास तातडीने पोलिसांना संपर्क साधा. कुठल्याही भुलथापांना बळी पडू नका, असंही पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे. त्यांनी एका फेक नोटीसीचा स्कीन शॉर्ट देखील सोशल आपल्या अधिकृत X अकाउंटवरून पोस्ट केला आहे.
"मुंबई पोलिस आयुक्तांकडून अटकेची नोटीस मिळाली का? जर तुम्हालाही अशी नोटीस आल्यास आमच्या निदर्शनास आणा. आयुक्तांच्या तसेच मुंबई पोलिसांच्या वतीने प्राप्त झालेल्या मेल, व्हॉट्सॲप, एसएमएस किंवा फोन कॉलवर कोणत्याही बनावट अटक सूचनेवर विश्वास ठेवू नका किंवा प्रतिसाद देऊ नका, असं विवेक फळसणकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
फेक नोटीसीत काय म्हटलंय?
सोशल मिडिया वापरकर्त्यांना अज्ञात व्यक्तीकडून पाठवली जाणारी फेक नोटीस इंग्रजी शब्दात आहे. यामध्ये प्राप्तकर्त्याला पोलीस आयुक्त कार्यालयात येण्यास सांगण्यात आलं आहे. त्यात असाही दावा करण्यात आलाय की, तुम्ही पोर्नोग्राफीशी संबंधित प्रकरणात गुंतलेले आहात. विशेष बाब म्हणजे या नोटीसीत सीबीआयचाही उल्लेख आहे. अशा प्रकारची नोटीस पाठवून अज्ञात व्यक्तीकडून तुम्ही फसवणूक होऊ शकते. त्यामुळे वेळीच सतर्क व्हा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.