कोल्हापूर : शिंगणापूर (ता.करवीर) ग्रामपंचायतीत मुस्लिम मतदारांची नवीन नावे मतदार यादीत समाविष्ट न करण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आल्याचे पत्र समाज माध्यमात प्रसिद्ध झाले. हे पत्र दिशाभूल करणारे असून, बांगलादेशी अल्पसंख्याकांबाबत तो ठराव केला असल्याचे सरपंचांनी स्पष्ट केले, तर ग्रामसभेत ते पत्र अधिकृत नसल्याचे ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषद स्तरावर गटविकास अधिकारी व करवीर तहसीलदारांना दिले आहेत. यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. शिंगणपूरची ग्रामसभा २८ ऑगस्ट २०२४ रोजी झाली. त्याचा ठराव समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाला.त्यात शिंगणापूर गावच्या हद्दीत नवीन मतदार नोंदणी करताना नवीन येणाऱ्या अल्पसंख्याकांची (मुस्लिम) नावे समाविष्ट करण्यात येऊ नयेत, असे सर्वांनुमते ठरले. तसेच ज्या ज्या वेळी नवीन मतदार यादी प्रसिध्द होईल, तेव्हा नवीन अल्पसंख्याकांची (मुस्लिम) नावे नोंद झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर ग्रामपंचायतीमार्फत हरकती घेऊन ती नावे कमी करण्यात यावीत, असा ठराव करण्यात आला.
या ठरावाला सूचक म्हणून प्रमोद संभाजी मस्कर, तर अनुमोदक म्हणून अमर हिंदुराव पाटील यांची नावे असून, त्याच पत्रावर सरपंच रसिका पाटील व ग्रामविकास अधिकारी दीपाली येडके यांचीही सही असल्याच्या या ठरावाची प्रत आज व्हायरल झाली आणि एकच खळबळ उडाली.
अलीकडे काही गावांत बांगलादेशी महिला आढळून आल्याने आमच्या गावात ते रोखण्याचा प्रयत्न झाला. गावातील हिंदू-मुस्लिम गुण्यागोविंदाने राहतात. ग्रामसभेचा ठराव चुकीच्या पद्धतीने व्हायरला झाला, त्यात ग्रामस्थांची काही चूक नाही.
-बाबासो मुल्लाणी, ग्रामस्थ, शिंगणापूर
नोंदणीचे अधिकार कोणाला?
मतदार यादीत नव्याने नांव समाविष्ट करणे किंवा नाव कमी करण्याची प्रक्रिया जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून होते. त्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांची नियुक्ती केली जाते, त्यांच्यामार्फत योग्य त्या पुराव्यासह ही प्रक्रिया होत असताना ग्रामपंचयातीला हे अधिकार आहेत का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
ठरावाची 'ती' प्रत चुकीची
शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या २८ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या ग्रामसभेच्या ठरावाची नक्कल पाहता समाजमाध्यमांवर प्रसारित झालेली प्रत व प्रत्यक्ष ठराव यात फरक आहे. याबाबत ग्रामसेवक यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित झालेली नक्कल चुकीची असल्याचे सांगितले. ग्रामसेवक यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेली प्रत कोणालाही देण्यात आलेली नाही. ठरावाची नक्कल तयार झाल्यानंतर व त्यावर सही केल्यानंतर त्यातील टायपिंगमधील चूक लक्षात आल्यानंतर ती कार्यालयातच ठेवण्यात आली. मूळ ठरावातील काही शब्द वगळण्यात आल्याने संभ्रम निर्माण झाल्याचे प्राथमिक चौकशीत दिसून येत असल्याचा अहवाल करवीरचे गटविकास अधिकारी पाटील यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला आहे.
सरपंचांची दिलगिरी
आमच्या गावच्या शेजारच्या गावात मे महिन्यात दोन बांगलादेशी महिला स्थानिक पत्त्यावर आधारकार्ड बनवून राहत असल्याचे निदर्शनास आले. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी शिंगणापूरच्या ग्रामसभेत चर्चा झाली. असे प्रकार रोखण्यासाठीचा आमचा प्रयत्न होता; पण काही लोकांनी सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न यातून सुरू केला आहे. चुकीच्या पद्धतीने प्रसिध्द झालेल्या या बातमीबद्दल या गावची सरपंच म्हणून मी दिलगिरी व्यक्त करते, असे शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच रसिका पाटील म्हणाल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.