राज्यात आचारसंहिता लागू होताच रश्मी शुक्लांची बदली?
मुंबई : राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून बाजूला करण्याच्या मागणीवरून केंद्रीय निवडणूक आयोगाने सध्या राज्याला कोणत्याही सूचना केल्या नसल्या, तरी आचारसंहिता लागल्यानंतर शुक्ला यांच्या बदलीचे स्पष्ट संकेत आयोगाने दिले आहेत.
काही महिन्यांपूर्वीच आंध्र प्रदेश विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा आचारसंहिता लागू झाल्यानंतर आंध्र प्रदेशच्या पोलिस महासंचालकांची बदली करण्यात आली होती. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्ला यांना हटविण्याची मागणी करणारे एक पत्र गेल्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले. काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी सरचिटणीस मुनाफ हकीम यांच्या नेतृत्वात निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. विधानसभेच्या निवडणुका निष्पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह वादग्रस्त व सत्ताधारी पक्षाला मदत करणार्या अधिकार्यांना हटवावे, अशी मागणी हकीम यांनी निवडणूक आयोगाकडे केली. राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुल्का यांची कारकीर्द संशयास्पद व वादग्रस्त आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग करणे यासारखे प्रकार त्यांनी केले असून, त्यांच्यावर गुन्हेही दाखल झालेले आहेत, अशी काँग्रेसने तक्रार केली आहे. हकीम यांनी ज्या पद्धतीने शुक्ला यांच्याविरुद्धचे आक्षेप नोंदविले, त्यांची आयोगाने प्रशंसा केली. त्यामुळे या मागणीशी सहमत असल्याचे संकेत या बैठकीतच प्राप्त झाले होते.
एकदा आचारसंहिता लागू झाली की, निवडणूक यंत्रणेत सहभागी असलेले व ही यंत्रणा राबविण्याची जबाबदारी असलेले सर्वच प्रशासकीय अधिकारी व यंत्रणा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अखत्यारित येतात. निवडणुकीवर प्रभाव टाकणारे अधिकारी हे मुदतवाढ मिळालेले असो, कंत्राटी सेवेत असोत की, सल्लागाराच्या भूमिकेत असोत, मुक्त व निष्पक्ष वातावरणात निवडणुका पार पडाव्यात यासाठी त्यांच्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.