बीडच्या बॅंकेत ३०० कोटींचा घोटाळा करून मथुरेत साधुच्या वेषात राहत होता, 'असा' सापडला पोलिसांच्या जाळ्यात
मथुरा - महाराष्ट्र पोलिसांच्या एका पथकाने वृंदावन पोलिसांच्या मदतीने मथुरा जिल्ह्यातील कृष्ण बलराम मंदिराजवळ एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्यावर महाराष्ट्रात सुमारे 300 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.
स्थानिक पोलिसांनी सांगितले की, बबन विश्वनाथ शिंदे असे या व्यक्तीचे नाव असून तो महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे. कृष्ण बलराम मंदिराला ब्रिटिशांचे मंदिर असेही म्हणतात. पोलिस अधीक्षक (शहर) डॉ. अरविंद कुमार यांनी सांगितले की, बबन शिंदे (63) याला अटक करण्यासाठी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील उपनिरीक्षक एसएस मुरकुटे आणि सहायक उपनिरीक्षक तुलसीराम येथे आले होते. बरीच चौकशी केल्यानंतर तो ब्रिटीश मंदिराजवळ साधूच्या वेशात फिरताना आढळून आला.
तपासादरम्यान शिंदे सुमारे एक वर्षापासून साधूच्या वेषात येथे राहत असल्याची माहिती मिळाली, तर महाराष्ट्र पोलिसांचे पथक मंदिर, आश्रम, हॉटेल, गेस्ट हाऊस आदी ठिकाणी त्याचा शोध घेत होते. पोलिसांनी त्याला नियमानुसार गुरुवारी न्यायालयात हजर केले, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. पोलिसांनी त्याचा ट्रान्झिट रिमांड मिळवला आणि नंतर त्याला महाराष्ट्रात नेले. शिंदे याच्यावर महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील जिजाऊ माँ साहेब मल्टी स्टेट बँकेमधील ठेवीदारांचे ३०० कोटी रुपयांचा गंडा घालण्याचा आणि तेथून फरार झाल्याचा आरोप आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.