Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जातीवाचक शिविगाळ करुन डोक्यात घातला दगड; १२ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

जातीवाचक शिविगाळ करुन डोक्यात घातला दगड; १२ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा
 

नायगाव - मंदिराचे ओट्यावर बसल्याच्या कारणावरून एकास जातीवाचक शिवीगाळ करुन डोक्यात दगड घालुन खून करण्यात आल्याची घटना देगलूर तालुक्यातील कोकलगाव येथे ता. १९ नोव्हेंबर २०१५ रोजी सकाळी ८ वाजता घडली होती.

या प्रकरणाचा निकाल आठ वर्षानंतर लागला असून, खुन करणाऱ्या १२ आरोपींना बिलोलीचे अति. सत्र न्यायधीश दिनेश ए. कोठलीकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कोकलगाव ता. देगलूर येथील चंद्रकांत तुकाराम सुर्यवंशी, वय ४५ वर्षे हा ति. १९ नोव्हेंबर २०१५ रोजी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान गावातील विरभद्र मंदिराच्या ओट्यावर बसला होता. १) निळकंठ जगन्नाथ पाटील, वय ४४ वर्षे, २) सोमनाथ होनयप्पा स्वामी, वय ५३ वर्षे, ३) हणमंत हावगी स्वामी, वय ३० वर्षे, ४) शंकर संगप्पा स्वामी वय ३८ वर्षे, ५) अमृत आनेप्पा बिरादार, वय ५३ वर्षे, ६) शिवाजी रामचंद्र मदने, वय ४४ वर्षे, ७) गणेश नागनाथ हत्ते, वय ३२ वर्षे, ८) शंकर सिद्राम हत्ते, वय ४७ वर्षे, ९) सुरेश माधवराव कवटगे, वय ४८ वर्षे, १०) जगन्नाथ हणमंतराव पाटील, वय ६८ वर्षे, ११) सुभाष संगप्पा हत्ते, वय ५७ वर्षे, व १२) सुनिल मलीकार्जुन पाटील, वय ३२ वर्षे, इत्यादींनी मंदिरावर येऊन धेडग्या, मांगडग्या तु मंदिराच्या ओट्यावर बसतोस काय, तुमची हालकी जात लई माजली म्हणुन जोरजोराने जातीवाचक शिवीगाळ करत आरोपी सुरेश माधवराव कवटगे यांने हातात दगड घेऊन फिर्यादीच्या कपाळावर मारहाण करुन जखमी केले.

भावाला मारहाण होत असल्याचे पाहुन फिर्यादीचा भाऊ मारोती तुकाराम सुर्यवंशी व विठ्ठल महादु मदने हे सोडविण्यासाठी आले. असता वरील सर्व अरोपीतांनी दगडाने विठ्ठल महादु मदने यास पण मारहाण केली. यावेळी मारोती तुकाराम सुर्यवंशी यास दगडाने डोक्यात जबर मारहाण करुन त्याचा खून केला. त्यानंतर या खुन प्रकरणी मयताचा भाऊ चंद्रकांत तुकाराम सुर्यवंशी यांनी त्याच्या भावाचा खून केल्याची फिर्याद मरखेल पोलीस ठाण्यात दिली. दिलेल्या तक्रारीवरुन वरील सर्व १२ आरोपी विरुध्द कलम ३०२,१४३, १४७,१४८, १४९, ३२४, भा.द.वि. आणि सहकलम ३ (१) (१०), ३ (२) (५) अँट्रासिटी अँक्ट नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गुन्ह्याच्या तपासानंतर मरखेल पोलीसांनी बिलोलीच्या अति. सत्र न्यायालयात दोषरोपपत्र दाखल केले. आठ वर्षे चाललेल्या या खटल्यात ८ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्याच्या आधारावर मा. न्यायाधीश दिनेश ए. कोठलीकर यांनी जन्म ठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकारतर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता संदिप बी. कुंडलवाडीकर यांनी बाजू मांडली.

कलम ३०२, भा. द. वि. अंतर्गत जन्म ठेपेची शिक्षा व दंड रु ५ हजार प्रत्येकी व दंड न भरल्यास १ महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. व कलम १४८ भा. द. वि. अंतर्गत १ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व दंड रु ५ हजार प्रत्येकी व दंड न भरल्यास १ महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. व कलम ३ (१) (१०) अॅट्रासिटी अँक्ट अंतर्गत १ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व दंड रु ५ हजार प्रत्येकी व दंड न भरल्यास १ महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच दंडाच्या रक्कमेतुन मयताच्या वारसाना रु १ लाख ५० हजार नुकसान भरपाई म्हणून द्यावे. असा आदेश मा. न्यायालयाने दिला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.