Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हसतं खेळतं गाव रातोरात संपलं, लोकांनी किंचाळत घर सोडलं, असं नेमकं काय घडलं?

हसतं खेळतं गाव रातोरात संपलं, लोकांनी किंचाळत घर सोडलं, असं नेमकं काय घडलं?
 

सोलापूर : पावसाळी दिवस होते. सगळीकडे हिरवळ दाटून आल्यानं दिवस नेहमीपेक्षा जास्त प्रसन्न असायचे. दिवसभर थकून भागून घरी आल्यानंतर लोक सुखाचे 2 घास खाऊन अंगणात गप्पा मारत बसायचे. चांदण्या रात्रीत एकमेकांचं हाल पुसणं हेच तर गावाकडल्या जगण्यातलं सुख. उद्याच्या दिवसाची चिंता नाही, येईल तो प्रत्येक दिवस आपला, असं हे जगणं. परंतु याबाबतीत एक गाव मात्र सपशेल दुर्दैवी ठरलं.

पावसामुळे हवेत एवढा गारवा निर्माण झाला होता की पंख्याची गरजच नव्हती. पहाटे सर्वजण साखरझोपेतच कोंबडा आरवण्याची वाट पाहत होते, पावसाच्या सरींचा तरी आवाज येईल असं वाटलं होतं खरं, पण ज्याची किंचितही कल्पना केली नव्हती असा झोप उडवणारा, उरात थरकाप भरवणारा आवाज कानावर धडकला अन् सर्वजण धाडकन् झोपेतून जागे झाले. हा आवाज होता जमीन फाटल्याचा, भूकंप झाल्याचा. हे गाव होतं अर्जुनसोंड, सोलापूरचं. 1993 साली झालेल्या त्या भयंकर भूकंपाला यंदा 31 वर्षे पूर्ण झाली. मात्र त्याच्या आठवणी तशाच ताज्या आहेत.

30 सप्टेंबर 1993 रोजी लातूरच्या किल्लारी गावात झालेल्या या भूकंपानं संपूर्ण देश सुन्न झाला होता. तब्बल 11 जिल्ह्यांना या भूकंपाचा फटका बसला होता. सोलापूर शहरापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या अर्जुनसोंड गावातील घरंच्या घरं जमीनदोस्त झाली. लोक जिवाच्या आकांतानं किंचाळत होते, जीव मुठीत धरून सैरवैर पळत होते पण शेवटी जमिनीनं त्यांच्या घरांना सामावून घेतलंच. भूकंपापासून गावकरी सुरक्षित राहावे यासाठी अख्खं गाव स्थलांतरित करण्यात आलं.

31 वर्षे झाले तरी गावकरी आपल्या जुन्या गावी परतण्यास तयार नाहीत. त्या भूकंपाचे हादरे आजही त्यांच्या मनात जिवंत आहेत. गावातील लोकांनी सांगितलं, 'संपूर्ण अर्जुनसोंड साखरझोपेत असताना भूकंपाचे हादरे जाणवायला लागले. घराच्या भितींवर एखादा मोठा ट्रक येऊन धडकला की काय एवढा भयानक आवाज झाला. मातीची घरं पूर्ण ढासळली, त्यात गावकरी जखमी झाले, कसेबसे अंगणात आले. त्यानंतर या गावातील लोकांचं स्थलांतर गायरानावर करण्यात आलं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.