Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सुशीलकुमार :अकलुज येथील सत्काराच्या निमित्ताने...- मधुकर भावे

सुशीलकुमार :अकलुज येथील सत्काराच्या निमित्ताने... - मधुकर भावे 
 

४ सप्टेंबर २०२४ ला श्री. सुशीलकुमार शिंदे यांचा ८३ वा वाढदिवस  घरीच साजरा झाला. त्यांनी ८४ व्या वर्षात पाऊल ठेवले. २०१५ साली त्यांनी जेव्हा अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले होते.... त्या दिवशी सोलापूर येथील लाखो लोकाच्या साक्षीने त्यांचा भव्य सत्कार देशाचे त्यावेळचे राष्ट्रपती श्री. प्रणवकुमार मुखर्जी यांच्या शुभहस्ते झाला होता. त्यानंतर गेली ९ वर्षे श्री. सुशीलकुमार यांनी कोणत्याही वाढदिवसाचा कार्यक्रम जाहीरपणे केला नाही. गेली ९ वर्षे तरी ४ सप्टेंबरला ते ‘गायब’ असायचे. फोन लागता लागायचा नाही. या महिन्याच्या ४ सप्टेंबरलासुद्धा ‘ते कुठे आहेत,’ याचा पत्ता लागला नाही.  सार्वजनिक जीवनात गौरव करून घेऊन फार मिरवावे, अशी अनेकांना हौस असते. शिंदेसाहेब त्यातील नाहीत.त्च्यांच्या वाढदिवसाचे ‘होर्डींग्ज’ लागलेले कधीही, कुठेही  पाहिलेले नाहीत. 

वाढदिवसाची जाहिरात ते करत नाहीत. वृत्तपत्रातही त्यांच्या वाढदिवसाची जाहिरात दिसत नाही. वाढदिवस ही कौटुंबिक आनंदाचा दिवस आहे... असे मानणारे ते आहेत. पण, कसे काय, कोणास ठाऊक.... विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सोलापूरला येवून त्यांना ८४ व्या वाढदिवस जाहीरपणे साजरा करण्याचे आमंत्रण दिले पण, कसे काय, कोणास ठाऊक.... विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सोलापूरला येवून त्यांना ८४ व्या वाढदिवस जाहीरपणे साजरा करण्याचे आमंत्रण दिले आणि ४ सप्टेंबरऐवजी आता २९ सप्टेंबर रोजी अकलूज येथे विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या पुढाकाराने सुशीलकुमाराचा वाढदिवस ९ वर्षांनंतर जाहिरपणे होत आहे. अर्थात न सांगता हे सगळ्यांना लक्षात येईल की, हा सत्कार श्री. शरद पवार साहेब यांच्या हस्ते होणार आहे.  शेवटी सत्कारासाठी सुशीलकुमारजी तयार झाले म्हणा, एकदाचे....!  ते विजयदादांमुळे... 

महाराष्ट्राच्या राजकारणात जी प्रसन्न चेहऱ्याची... सात्विक आणि मिळालेल्या संधीचे सोने करणारी, कष्टाने मोठी झालेली नेते मंडळी आहेत त्यात सुशीलकुमार हे आहेत. आणखीन एक त्यांच्यासाठी मोठे आव्हान होते की, महाराष्ट्राच्या राजकारणात ते अशा जातीत जन्मले आहेत की, राजकीयदृष्ट्या त्या जातीचे महत्त्व नाही. घरी परिस्थिती अत्यंत बेताची असताना प्रवाहाच्या विरुद्ध पोहून त्यांनी शिक्षणासाठी पहिले युद्ध केले आणि जिंकले. छोट्या दोन मुलींना सांभाळायचे काम महिना १० रुपयांवर स्वीकारून रात्रशाळेत शिक्षण पूर्ण केले. नंतर कोर्टात बेलिफाची नोकरी करून या माणसाने जिद्द सोडली नाही. त्याच कोर्टात ‘काळे कोट घालून येणारे वकील’ बघून ‘मीही एक दिवस काळा कोट घालणार...’ या जिद्दीने ते वकील झाले.  पुढे पोलीस इस्न्पेक्टरच्या पदाची जाहिरात वाचल्यावर त्यासाठी आवश्यक परीक्षा देवून ते पोलीस इन्स्पेक्टर झाले..... सोलापूरच्या ढोर गल्लीतील हा तरुण पुढे दिल्लीपर्यंत स्वकर्तृत्त्वाने गेला आहे. आणि गेल्या ५० वर्षांच्या राजकारणात राज्यमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, काँग्रेसचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार, राज्यपाल, केंद्रीय ऊर्जा मंत्री, केद्रीय गृहमंत्री... संसदेचे नेेते...  एखादा छोटा कार्यकर्ता ‘कुठून-कुठे’ झेप घेवू शकतो.... आणि या सर्व प्रवासात ज्यांच्या अंगावर एकही ओरखडा आला नाही, अशांच्या पाच-दहा जणांच्या यादीत सुशीलकुमार हे नाव अग्रभागी आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या नेत्याला अगदी चपखल शोभून दिसेल असे त्यांचे वर्णन म्हणजे.... ‘काटे नसलेला गुलाब....’ या एका ओळीत त्यांचे सगळे व्यक्त्ाीमत्त्व नेमके व्यक्त होते. महाराष्ट्राच्या राजकाणातील सदा प्रसन्न, हसतमुख... निवडणुकीत विजयी झाल्याने हुरळून न जाणारे, आणि पराभूत झाल्यावर चेहऱ्यावरील हास्य गायब न झालेले, असे जे थोडे नेते आहेत... त्यातले दोन चेहरे समोर येतात... एक राजारामबापू पाटील आणि दुसरे म्हणजे सुशीलकुमार शिंदे... मला तर नेहमी असे वाटते की, जग िनर्माण होवून लाखो वर्षे झाली.... कोणीही मोजली नाहीत. मोजताही येणार नाहीत... पण रोजची सकाळ जशी प्रसन्न वाटते असा गेल्या ५० वर्षातील राजकारणातील सदा प्रसन्न व्यक्तीमत्त्वाचा चेहरा  म्हणून सुशीलकुमारांनंतर विलासराव यांचेच नाव समोर येते.
राजकारणाचा काही वारसा घरी नसताना, दोन वेळेच्या जेवणाचीही भ्रांत असताना, सोलापूरच्या ढोर गल्लीतला एक छोटा मुलगा दिल्लीपर्यंत देशाच्ो गृहमंत्रीपद, संसदेचे नेते पद भूषवितो... मला असे वाटते की, महाराष्ट्राला भूषण वाटावे, असे हे कतृत्त्व आहे. आणि या सर्वकाळात सुशीलकुमार शिंदे जमिनीवर राहिले. काळावर पाऊले उमटवून आपला ठसा त्यांनी  निर्माण करून ठेवला आहे. ९ नोव्हेंबर १९७४ ते आजच्या तारखेपर्यंत हा त्यांचा प्रवास राजकारणातील  जवळपास ५० वर्षांचा... त्याच्या आगोदरचा प्रवास म्हणजे, जीवनाची सुरुवात एका कोर्टातील बेलीफ, नंतर जिद्दीने वकील, नंतर पोलीस खात्यात प्रवेश. तिथे एका पोलीस ठाण्याचे प्रमुख आणि अचानक एक दिवस म्हणजे १९७४ साली शरद पवार साहेबांकडून श्री. श्रीराम लेले यांच्यामार्फत काँग्रेसमध्ये येण्याचे आमंत्रण.... विधानसभेचे तिकीट देण्याचे आश्वासन.... त्याकरिता नोकरी सोडणे.... तिकीट मिळाले नाहीच आणि नोकरी नोकरी गेली... पण त्यांच्या चेहऱ्यावर फरक पडला नाही. परिस्थितीचा सामना करत असताना त्यांच्या नशिबाने पुढच्याच वर्षी करमाळा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली आणि करमाळा मतदार संघातून ते आमदार झाले. त्यांच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराला त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक जातात... ते भाषणात सांगतात की, ‘पोट निवडणूक प्रचाराला मुख्यमंत्री कधी येत नाहीत.... पण, या नेत्याला निवडून द्या.... पुढचे माझ्यावर सोडा...’ आिण निवडणुकीतील यशानंतर ९ नोव्हेंबर १९७४ ला राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्या दिवसापासून या नेत्याने मागे वळून पाहिले नाही. 

राज्यमंत्री, मग कॅबिनेट मंत्री, ९ वर्षे अर्थमंत्री, नगरविकास मंत्री, १८ जानेवारी २००३ ते २ नोव्हेंबर २००४ राज्याचे मुख्यमंत्री.... २००४ ते २००६ आंध्रप्रदेशचे राज्यपाल... २९ जानेवारी २००६ ला केंद्र सरकारमध्ये ऊर्जा मंत्री, २०१२ ला देशाचे गृहमंत्री... संसदेचे नेते... असा एक फार मोठा राजकीय काळ सुशीलकुमार शिंदे यांनी अनुवभवला. पण, लोकांपासून ते कधीही दूर झाले नाहीत. काँग्रेस पक्षात आल्यादिवसापासून आजतागायत ते काँग्रेसचेच आहेत. शरद पवार यांनी त्यांना राजकारणात आणले. शरद पवारसाहेबांनी वेगळा पक्ष उभा केला तेव्हा शिंदेसाहेब त्यांच्यासोबत गेले नाहीत. ते काँग्रेस सोबतच राहिले. पण, यशवंतरावांचा आणि शरद पवारांचा विचार याची साथही त्यांनी कधीही सोडली नाही. आताच्या केंद्रातील भाजप सरकारने त्यांना अनेक प्रलोभने दाखवली. पण, भले-भले भाजपामध्ये गेले... पदे मिळवून बसले... सुशीलकुमारांनीच सर्व प्रलोभने नाकारली. आणि ठामपणे काँग्रेसमध्ये राहिले. त्यावेळच्या राजकीय दहशतीच्या काळात हा निर्णय करणे सोपे नव्हते. 
 
अत्यंत संयमित, सर्व राजकीय पक्षांत भरभरून मित्र  आणि देशाच्या राजकारणातील आपल्या कतृत्त्वाने स्वत:ची जागा निर्माण करण्याचे कौशल्य त्यांनी सिद्ध केले आहे. सोलापूरातून सर्वसाधारण जागेवर लोकसभेत निवडून आलेल्या सुशीलकुमारांना युनाेमध्ये पाठवायच्या शिष्टमंडळाचे अध्यक्ष, त्यावेळी पंतप्रधान असलेल्या वाजपेयींनीच केले.  गुजरात भूकंपाच्या वेळी वाजपेयी साहेबांनीच शरद पवार साहेबांना आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष करून भूज येथे झालेल्या भूकंपाच्यावेळी तेथे पाठवले. त्यावेळच्या सत्ताधारी नेत्यांची विरोधकांशी वागण्याची आणि नातं राखण्याची ही सुसंस्कृत पद्धत होती. अलिकडे हे सगळे पहायला मिळणे शक्य नाही. ‘विरोधक म्हणजे शत्रू’. असा आताचा काळ. महाराष्ट्रात यशवंतराव असोत.... शरद पवार असोत... किंवा सुशीलकुमार असोत... विरोधकांना त्यांनी कधीही शत्रू मानले नाही.... 

सुशीलकुमारांच्या राजकारणाचीसुद्धा एक फार मोठी गंमतच आहे... आणि अशा राजकीय घटना त्यांनी कधीच मनाला लावून घेतल्या नाहीत. जेव्हा सोलापूरचा लोकसभा मतदारसंघ राखीव नव्हता... तेव्हा सोलापूरच्या मतदारांनी तीन वेळा सुशीलकुमारांना लोकसभेत मोठ्या मताधिक्याने पाठवले. आणि हा मतदारसंघ ‘राखीव’ झाला तेव्हा ते पराभूत झाले. आपला पराभव त्यांनी खेळाडूपणे स्वीकारला आणि पचवलाही.... पण सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा गेली पाच वर्षे कसा विचका आणि पचका झाला आहे, हे अाता सोलापूरकर अनुभवित आहेत.  मात्र २०१९ च्या पराभवाचा बदला २०२४ च्या निवडणुकीत प्रणिती शिंदे यांचा दणदणीत मतांनी विजयी करून सुशीकमार यांनी घेतला पण, ‘बदला’ हा शब्द त्यांच्या शब्दकोषात नाही.  ‘बदला घेण्याच्या’ च्या भावनेने  ते कधीच कोणाशी वागलेले नाहीत.  म्हणूनच राजकाराच्या बाहेर साहित्य, कला, नाटक, चित्रपट या सर्व विषयांत रूची असलेले, अनेक मराठी कविता तोंडपाठ असलेले राजकारणात सापडणे अवघड आहे. सुशीलकुमार त्याला अपवाद आहेत.  आणि हा अपवाद राजकीय संदर्भातही आहे. 

दोन संदर्भ मुद्दाम सांगतो....  इतिहास असे सांगतो की, या देशात ज्याला  ‘राज्यपाल’ म्हणून केंद्रीय गृहखात्याने राष्ट्रपतींमार्फत नियुक्त केले, त्या सर्वांची राज्यपालपदाची मुदत संपल्यावर राजकारणातूनच त्यांना निवृत्त व्हावे लागले. सुशीलकुमार हे असे सन्माननीय अपवाद अाहेत की, आंध्रप्रदेशच्या राज्यपाल पदाची मुदत संपताच देशाच्या केंद्रीय नेत्यांनी त्यांच्यावर केंद्रीय ऊर्जा मंत्रीपदाची जबाबदारी सलग साडेसहा वर्ष सोपवली. सलग साडेसहा वर्षे हे खाते सांभाळलेले  सुशीलकुमार केंद्र सरकारमधील एकमेव ऊर्जामंत्री आहेत. आणि या काळात देशाच्या ‘इंटरस्टेट ग्रिडींग’ची व्यवस्था त्यांच्याकाळात निर्माण झाली. दोन लक्ष पेक्षा अधिक औष्णिक ऊर्जा प्रकल्पांची िनर्मिती त्यांच्याच काळात झाली. हे इंटरस्टेट ग्रिडींग म्हणजे महाराष्ट्रातील वीज  पुरवठ्यात अचानक काही  बिघाड झाला तर मध्यप्रदेशकडून महाराष्ट्राला वीज मिळू शकते. हे ‘इंटरस्टेट ग्रिडींग’ सुशीलकुमार यांच्या काळात झाले. संसदेचे नेते राहिलेले सुशीलकुमार हे एकमेव मराठी नेते आहेत. मनमोहन सिंग लोकसभेचे सभासद नसल्याने ही जबाबदारी सुशीलकुमार यांच्यावर आली. या नेत्याने केवळ एका जिल्ह्यासाठी म्हणजे सोलापूर जिल्ह्याकरिता अख्खं  विद्यापीठ मंजूर करून आणले. 

गृहमंत्री असताना एक संपूर्ण दिवस  आणि पूर्ण रात्र ते कुठे आहेत याचा पत्ता नव्हता.... त्यांच्या घरून सौ. उज्ज्वलावहिनी सतत संपर्क करत होत्या.... पण, ते कुठे आहेत, पत्ता लागत नव्हता.... दुपारी घरी जेवायला आले नाहीत.... रात्री जेवायला आले नाहीत... नेमके कुठे आहेत, माहिती नाही.... गृहमंत्रालयात नाहीत.... त्यांचा मोबाईल ‘स्वीच-अॅाफ’ आणि सगळ्या स्टाफचाही मोबाईल बंद. पहाटे पाच वाजता सुशीलकुमारजी घरी आले.... ‘खूप भूक लागलीय’ म्हणाले.... सौ. उज्ज्वलावहिनी म्हणाल्या, ‘होतात कुठे?’ हे महाराज म्हणाले, ‘पहिले जेवायला वाढ....’ जेवले आणि लगेच झोपी गेले... सकाळी सात वाजता त्यांच्या कन्येचा मुंबईहून आईला फोन गेला.... ती फोनवर सांगत होती, ‘आई, आई, कसाबला फाशी दिली  गं....’ 
गाढ झोपेत असलेल्या सुशीलकुमार यांच्या बेडरूममध्ये जावून त्यांच्या पत्नी उज्ज्वलावहिनी सांगू लागल्या, ‘अहो, उठा... उठा.... कसाबला फाशी दिली....’ झोपेतून जागे होवून सुशीलकुमार म्हणाले..... ‘तीच सगळी व्यवस्था करण्याकरिता मी संपूर्ण दिवस आणि रात्रभर बाहेर होतो.’ उज्ज्वलावहिनी म्हणाल्या, ‘अहो, मग मला सांगायचं नाही का?’.... सुशीलकुमार शांतपणे म्हणाले, ‘गृहमंत्री म्हणून मी घेतलेल्या शपथेमध्ये अशा घटना पत्नीलाही सांगायला मला कायद्याची परवानगी नाही.... आता तुला कळले ना, मी कुठे होतो ते....’ 

कसाबला फाशी झाली.... याची जाहिरातबाजी कधीही केली गेली नाही. नंतरच्या माेदी सरकारने अशाच एका अतिरेक्याला फाशी दिले... तो ‘इव्हेंट’ म्हणून देशभर साजरा झाला. सुशीलकुमारच्या वेळचे सरकार .... त्यावेळचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग.... आज तर सतत त्यांच्या कार्यकाळाची आठवण येत आहे...   आयुष्याची ८१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर सुशीलकुमार राजकारणापासून काहीसे अलिप्त होते. प्रणितीच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा ते तडाकून मतदारसंघात उतरले... आणि त्यानी विजय मिळवून दाखवला...  राजकारणात असतानाही त्यांनी जीवनाचा आनंद सातत्याने घेतला. कला, साहित्य, संस्कृती, क्रीडा या सगळ्या विषयांत त्यांना आनंद आणि रूची आहे... त्यांचे वाचन अफाट आहे... महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त मराठी पुस्तकांचे प्रकाशन ज्यांच्या हस्ते झाले ते नाव सुशीलकुमारच आहे. त्यांचे ‘सुशीलकुमार’ हे नाव सुद्धा त्यांनी अचार्य अत्रे यांच्या ‘लग्नाची बेडी’ या नाटकात काम करण्यासाठीच घेतलेले होतेे. त्यावेळी दिलीपकुमार, राजेंद्रकुमार ही नावे कमालीची प्रसिद्ध होती. म्हणून यांनी नाटकात काम करण्यासाठी नाव घेतले ‘सुशीलकुमार’ अाणि तेच नाव पुढे राजकारणात त्यांनी यशस्वीपणे  मिरवले.  मुळचा सोलापूरचा ‘ग्यानबा’.... महाराष्ट्रात आणि देशात ‘सुशीलकुमार’ म्हणून प्रख्यात झाला....  जीवनात ते तृप्त आहेत... ‘समाजाने आणि काँग्रेसने मला खूप काही दिले आहे... कल्पनाही केली नव्हती अशा पदांवर मला काम करता आले.’ ही भावना ते नेहमी व्यक्त करतात आणि त्यांच्या प्रत्येक निर्णयात गरीब माणूस मी डोळ्यांसमोर ठेवला, हे  ते अभिमानाने सांगतात... देशाचे सगळे नेते, सगळे विरोधी नेते यांच्याबद्दल कृतज्ञातेची भावना ते व्यक्त करतात... इंदिरा गांधी, सोनिया गांधी, राजीव गांधी अशा सर्वांशी जिव्हाळ्याचा संबंध आल्याबद्दल त्यांनी आपली कृतज्ञाता नेहमीच व्यक्त केली. त्यांच्या पत्नी माहेरच्या उज्ज्वला वैद्य यांनी त्या काळात अांतरजातीय विवाह करून क्रांतीकारी निर्णय केला. त्याचे वर्णन करताना सुशीलकुमार म्हणतात की, ‘माझ्यापेक्षा जास्त धोका तिनेच पत्करला होता... आणि आयुष्यभर मला साथ दिली.’  कुटुंबाबद्दल.... महाराष्ट्राबद्दल आणि सर्व नेत्यांबद्दल त्यांनी त्यांची कृतज्ञाता नेहमीच व्यक्त केली आहे.
असे हे सदाबहार सुशीलकुमार.... रविवार, दिनांक २९ सप्टेंबर रोजी अकलुज येथे त्यांच्या भव्य सत्काराचे आयोजन आहे. त्याचवेळी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार विजयदादांनी अायोजित केलेला आहे. विजयदादा एकदा मैदानात उतरले की, मग दाही दिशा ते दणाणून टाकतात.  माढ्याची जागा त्यांनी जिंकून दाखवलीच...  चंद्राला तापलेले कोणिही बघितलेले नाही. सुशीलकुमार िचडले, संतापले, अपशब्द बोलले.... असेही कधीही कोणाला दिसले नाही. त्यामुळे असे फार थोडे लोक असतील ज्यांच्या स्वभावाला पैर्णिमेच्या शीतल चांदण्याची उपमा देतायेईल, सुशीलकुमार हे व्यक्तिमत्त्व तसेच आहे...   शरद पवारसाहेबांनी त्यांना काँग्रेसमध्ये आणले. आणि शरद पवारसाहेबांच्या हस्ते हा सत्कार हा सह्स्त्रचंद्र दर्शनाच्या पलिकडचा योग आहे.
सुशीलकुमार यांना मन:पूर्वक शुभेच्छा....

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.