डोळ्यातील घाण समजून केले दुर्लक्ष, पण निघाला त्वचेचा कॅन्सर; पुढे असं झालं की...
नवी दिल्ली: स्वीडनच्या 81 वर्षीय महिलेला तिच्या डाव्या डोळ्यात काही अडचण जाणवत होती. सुरूवतीला तिला ही समस्या किरकोळ वाटत होती. मात्र हा एक प्रकारचा दुर्मिळ त्वचेचा कॅन्सर होता. तिच्या या निष्काळजीपणामुळे तिला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागले.
अखेर डॉक्टरांना काही कठोर निर्णय घ्यावे लागले.
स्वीडनच्या स्काराबॉर्ग हॉस्पटलमध्ये या महिलेवर उपचार करण्यात आले. महिलेला सुरूवतीला तिच्या डाव्या डोळ्यात घाण असल्याचे जाणवले. त्याचबरोबर तिला पापण्यांमध्ये सूजही दिसून आली. महिलेने डॉक्टरांशी संपर्क साधला असता तिला सूज कमी करण्यासाठी काही औषधे देण्यात आली. मात्र काही दिवसांनी ही समस्या वाढली आणि यानंतर डॉक्टरांनी महिलेला काही टेस्ट करण्यास सांगितल्या.
जेव्हा डॉक्टरांनी महिलेच्या डोळ्यांची खोलवर तपासणी केली तेव्हा त्यांना आढळून आले की तिच्या पापणीच्या आत एक गाठ तयार झाली आहे. बायोप्सी केल्यानंतर लक्षात आले की ही गाठ वास्तवात अमेलेनोटिक मेलेनोमा' नामक त्वचेच्या कर्करोगाचा दुर्मिळ प्रकार आहे. हा प्रकार इतर आजारांप्रमाणेच दिसत असला तरीही हा अतिशय घातक आहे. कारण यामध्ये पिगमेंटेशनची कमतरता असल्याने तो शोधणे खूप कठीण आहे. या प्रकारच्या कर्करोगाच्या केवळ 10% प्रकरणांमध्ये मेलेनोटिक मेलेनोमा आढळतो.
आजाराची पुष्टता झाल्यानंतर डॉक्टरांनी महिलेचं डोकं, मान आणि डोळ्यांच्या वेगवेगळ्या भागांची तपासणी केली. यामध्ये असे आढळून आले की हा कर्करोग तिच्या डोळ्यात आणि डोळे हलवणाऱ्या स्नायूंमध्ये पसरला आहे. यामुळे डॉक्टरांना महिलेचा डोळा काढून टाकावा लागला. अन्यथा कर्करोगावर पूर्णपणे उपचार करणे संभव नव्हते.शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी सांगितले की पापणीमधील हा ट्यूमर 13 मिमी रुंद आणि 7 मिमी खोल होता. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि शस्त्रक्रियेच्या नऊ महिन्यांनी महिला बरी झाली. तिने गमावलेल्या डोळ्याच्या जागी कृत्रिम डोळ्यांचा वापर सुरू केला.
याआधी ५० वर्षीय स्वीडिश महिलेलाही या प्रकारचा कर्करोग झाला होता. तिच्या डोळ्यांमध्ये एक जखम होती. वेळीच शस्त्रक्रिया करून तो ट्यूमर काढण्यात आला आणि तिला रेडियोथेरपी देण्यात आली. अशा दुर्लभ प्रकरणांचा उपचार करणे अतिशय आव्हानात्मक आहे. म्हणूनच तुम्हालाही डोळ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.