कोलकाता बलात्कार प्रकरणाचा निकाल कधी देणार?; भर कार्यक्रमात गायिका उषा उत्थुप यांचा सरन्यायाधीशांना सवाल
कोलकाता बलात्कार व खून प्रकरणामुळं संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी होत आहे. प्रसिद्ध गायिका उषा उत्थुप यांच्याही भावना वेगळ्या नाहीत. याचं प्रत्यंतर अलीकडंच आलं. एका
कार्यक्रमात सरन्यायाधीश चंद्रचूड यांची भेट होताच उत्थुप यांनी तिथंच
त्यांना या संदर्भात प्रश्न केला. सीएनएन न्यूज १८ च्या 'She Shakti'
कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे
देखील या कार्यक्रमात होते. यावेळी दोघांची भेट झाली. त्यांनी काही वेळ
संवाद साधला. याच वेळी उषा उत्थुप यांनी सरन्यायाधीशांना कोणताही आडपडदा न
ठेवता थेट प्रश्न केले.
तुम्ही आहात कुठं, असा पहिला प्रश्न उत्थुप यांनी सरन्यायाधीशांना केला. मनी कंट्रोलच्या पत्रकार चंद्रा आर. श्रीकांत यांनी एक्स अकाऊंटवर उत्थुप आणि चंद्रचूड यांच्यातील संवादाविषयी सविस्तर पोस्ट लिहिली आहे. त्या म्हणतात, उषा उत्थुप बोलताना हातचं राखून बोलत नाही. त्या परखड आहेत. काल संध्याकाळी त्या CJI चंद्रचूड यांना भेटल्या आणि भेटताच क्षणी मनातलं बोलून गेल्या.'तुम्ही या कार्यक्रमात काय करताय? तुम्हाला कोर्ट नाही का? कोलकाता प्रकरणात तुमचा निर्णय तुम्ही कधी जाहीर करत आहात? सगळं जग वाट बघतंय,' असं उत्थुप म्हणाल्या. चंद्रचूड यांनी त्यांचे हे प्रश्न खेळकरपणे घेतले, असं पोस्टमध्ये पुढं म्हटलं आहे.
चंद्रचूड उत्थुप यांनी एकत्र गायले गाणे
उषा उत्थुप आणि सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी या कार्यक्रमात एकत्र गाणंही गायलं. या कार्यक्रमात उषा उत्थुप यांच्यासह बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री किरण खेर, सिकंदर खेर, भूमी पेडणेकर, रसिका दुगल आणि शेफाली शाह हे देखील होते.
उद्धव ठाकरे यांनीही चंद्रचूड यांना हाणले होते टोले
उषा उत्थुप यांच्या आधी शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही छत्रपती संभाजीनगरमधील जाहीर सभेत सरन्यायाधीश चंद्रचूड यांना काही खोचक टोले हाणले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चंद्रचूड यांच्या घरी गणपती दर्शनाला गेल्याचा संदर्भ यामागे होता.सध्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील फुटीचा आणि महाराष्ट्र सरकार कायदेशीर आहे की बेकायदेशीर या संदर्भातील खटला सर्वोच्च न्यायालयापुढं आहे. सरन्यायाधीशांच्या खंडपीठापुढंच याची सुनावणी सुरू आहे. मात्र, राज्य सरकारचा कार्यकाळ संपत आला तरी त्यावर निकाल लागलेला नाही. प्रत्येक वेळी पुढची तारीख दिली जात आहे. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी सरन्यायाधीशांना चिमटा काढला होता. शिवसेनेच्या प्रकरणातील सुनावणीसाठी तुमच्या निवृत्तीनंतरचीच तारीख देऊन टाका, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.