नवी दिल्ली: डिलर्सकडे विक्रीविना पडून असलेल्या गाड्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढल्याने फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनने चिंता व्यक्त केली आहे. ऑगस्ट महिन्यात विक्रीविना पडून असलेल्या वाहनांचा साठा ७० ते ७५ दिवसांवर गेला आहे. पडून असलेल्या या वाहनांची किंमत तब्बल ७७,८०० कोटी रुपयांच्या घरात आहे.
पडून असलेल्या वाहनांची संख्या अशीच वाढत गेल्यास देशभरातील डीलर्सना भविष्यात गंभीर संकटाला तोंड द्यावे लागू शकते. ग्राहकांकडून कमी असलेली मागणी, सतत सुरु असलेला पाऊस यामुळे या हंगामात वाहनांच्या विक्रीवर गंभीर परिणाम झाला आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये वाहनांच्या देशभरातील विक्रीमध्ये ३.४६ टक्क्यांची घट झाली आहे.
नेमके किती नुकसान होणार?
ऑगस्टमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत झालेल्या वाहनांच्या विक्रीमध्ये ४.५३ टक्के घट झाली. ऑगस्ट २०२३ मध्ये ३,२३,७२० वाहने विकली गेली होती. ही संख्या यंदाच्या ऑगस्टमध्ये घसरून ३,०९,०५३ वर आली आहे. जुलै महिन्याच्या तुलनेतही वाहनविक्री ३.४६ टक्क्यांनी घटली आहे. सामान्यपणे डिलर्सना विक्रीवर तीन ते चार टक्के नफा होत असतो. सणांच्या हंगामासाठी साठ्यामध्ये जादा वाहने ठेवण्यासाठी डिलर बँकांकडून कर्ज घेतात व पैशांची तजवीज करीत असतात. वाहनांचा साठा १० त्यांच्याकडे १० दिवसांपेक्षा अधिक काळ पडून राहिला तर त्यांच्या नफा दोन टक्क्यांनी कमी होत असतो.
'फाडा'ने काय दिला इशारा?
स्टॉक संपवण्यासाठी वर्षाच्या अखेरीस अतिरिक्त सूटही द्यावी लागते. यामुळे डिलरांचे आर्थिक गणित कोलमडून जाऊ शकते. फाडाने डिलरांना कर्जपुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्थांना दोन वेळा पत्र लिहून चिंता व्यक्त केली. फाडाच्या मते डिलरांना मोठ्या प्रमाणात कर्ज दिले तरी वाहनांचा साठा पडून असल्याने डिलरांच्या नफ्यात घट होण्याची भीती आहे. त्यामुळे डिलरांना कर्ज उपलब्ध करुन देताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.