विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे
रुपये दिले जातात. दरम्यान, लाडकी बहीण योजनेवरून विरोधक सरकारवर
सातत्याने टीका करत आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पत्रकारांशी
अनौपचारिक चर्चा करतांना सरकारवर लाडकी बहीण योजनेवरून टीका केली. लाडकी
बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता दिल्यानंतर शासनाकडे सरकारी कर्मचाऱ्यांना
जानेवारीत पगार द्यायलाही पैसे राहणार नाहीत. तिजोरी रिकामी होईल, असं राज
ठाकरे म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या विदर्भाच्या
दौऱ्यावर आहेत. आज ते अमरावतीच्या दौऱ्यावर असून अमरावतीत पत्रकारांशी
अनौपचारिक संवाद साधताना त्यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं. ते
म्हणाले की, समाजातील कोणताही घटक फुकटात काहीही मागत नाही.
सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी योजना असेल तर परिणाम वाईट होतो. राज्य
खड्ड्यात घातलं जात असेल तर ते चुकीचं आहे. महिलांना अशा प्रकारे पैसे न
देता राज्यात नवीन उद्योग आणा, त्यांना रोजगार देऊन सक्षम केलं पाहिजे, असं
म्हणत राज ठाकरेंनी योजनेवर अप्रत्यक्ष टीका केली.
पुढं बोलतांना ते म्हणाले, लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता दिल्यानंतर शासनाकडे सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारीत पगार द्यायलाही पैसे राहणा नाहीत. तिजोरी रिकामी होईल, असं राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनीही राज ठाकरेंच्या वक्तव्याचे अप्रत्यक्ष समर्थन केले आहे. राज्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नसतील तर यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असेल, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.
प्रफुल्ल पटेल यांनी राज ठाकरेंवर टीका
राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर महायुतीमधील प्रफुल्ल पटेल यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला आहे. ज्यांच्या पोटात दुखतं तेच अशी वक्तव्य करतात, असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली. आमच्या सर्व बहिणी आमचं स्वागतच करत आहेत, असंही ते म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.