देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिराची ओळख आहे. देश-परदेशातून हजारो भाविक बालाजीच्या दर्शनासाठी मंदिरात येत असतात. या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसादात एक मोठा लाडू दिला जातो. पण, तिरुपती मंदिराच्या प्रसादाच्या लाडूमध्ये चक्क बीफ म्हणजे प्राण्यांची चरबी आणि माशांचे तेल वापरले जात असल्याचा दावा आंध्र प्रदेशातील मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे, यामुळे भाविकांच्या मनात आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून तिरुपती बालाजी मंदिरात प्रसादात मिळणारा हा एक खास प्रकारचा लाडू भाविकांना आवडतो. अनेक जण जो कोणी बालाजीच्या दर्शनाला जाईल, त्याला खास लाडूचा प्रसाद आणण्यास सांगतात. कारण हा प्रसाद बनवण्याची पद्धतच फार वेगळी आहे. तुम्हीदेखील हा लाडू घरी बनवू शकता, पण यासाठी कोणते साहित्य लागेल आणि कृती काय असेल जाणून घेऊ…
प्रसाद लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य
बेसन : ४०० ग्रॅम
तूप : १ लिटर
साखर : ३५० ग्रॅम
बदाम : ५० ग्रॅम
काजू : १०० ग्रॅम
खडी साखर : २० ग्रॅम
वेलची : १० ग्रॅम
दूध : ३०० मिली
तांदळाचे पीठ : १०० ग्रॅम
प्रसादाचा कापूर
असा बनवला जातो तिरुपती मंदिरातील लाडू प्रसाद
१) सर्वप्रथम एका भांड्यात १०० ग्रॅम साखर दुधात विरघळेपर्यंत मिसळा.
२) यानंतर त्यात तांदळाचे पीठ आणि बेसन मिक्स करा, गुठळ्या होऊ नयेत म्हणून पीठ चांगले ढवळत राहा. पीठ चांगले घट्ट होण्यासाठी त्यात अधिक दूध घाला.
२) आता कढईत तूप गरम करा. एका कापडाला बारीक छिद्र करून कढईत बुंदी पाडा. अशाप्रकारे पाडलेली बुंदी सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. बुंदीतील अतिरिक्त तेल काढून गाळून घ्या.
३) आता काजू-बदामासारखे बारीक चिरलेले तुकडे तुपात चांगले तळून घ्या.
४) आता दुसऱ्या पॅनमध्ये २५० ते ३०० ग्रॅम साखर पाण्यात विरघळवून घ्या. साखर पाण्यात चांगली विरघळून त्याचे सिरप तयार होईपर्यंत ते उकळवा. नंतर त्यात वेलची पूड घाला.
५) तळलेली बुंदी बारीक सुटसुटीत करून त्यात साखरेचा पाक टाका, यानंतर त्यात तळलेले काजू- बदाम-मनुके, खडीसाखर आणि प्रसादाचा कापूर टाका.
६) हे मिश्रण थोडे गरम झाल्यावर पुन्हा चांगले मिक्स करून घ्या आणि त्याचे लहान गोल आकाराचे लाडू बनवा. अशाप्रकारे तयार लाडू थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.