Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अजितदादांचं मोठं विधान; म्हणाले, 'केंद्रात आपला जावई...'

अजितदादांचं मोठं विधान; म्हणाले, 'केंद्रात आपला जावई...'
 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेला पराभव महायुतीच्या नेत्यांना चांगलाच जिव्हारी लागला आहे. महाराष्ट्रात जरी कमी जागा मिळाल्या असल्या तरी केंद्रात मोदी यांच्या नेतृत्वात सरकार आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत विरोधकांना मते देऊन काही फायदा होणार नाही. तिथे त्यांचे कोणी ऐकणार नाही. केंद्रात जाऊन कामे करण्याची धमक फक्त महायुतीच्या नेत्यांमध्ये आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभेत केलेली चूक विधानसभेच्या निवडणुकीत करू नका, असे आवाहन केले.

केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान हे गोंदिया जिल्ह्याचे जावई आहेत. त्यामुळे गोंदिया-भंडाऱ्यातील शेतकऱ्यांना ते रिकाम्या हाताने पाठवणार नाहीत, असेही यावेळी अजितदादांनी विनोदाने सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसची न्याय सन्मान यात्रेचा कार्यक्रम शनिवारी भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदारसंघात घेण्यात आला. यावेळी अजित पवारांनी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना, कृषीपंप वीज माफी यासारख्या योजनांची माहिती महिलांना सांगताना काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे नेते फक्त आरोप करतात, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

लोकसभेच्या निवडणुकीत्यांनी संविधान बदलणार असल्याचे सांगून तुमची दिशाभूल केली. मात्र, संविधान कोणी बदलू शकत नाही हे लक्षात ठेवा. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास तुमच्या जीवनात काही एक फरक पडणार नाही. भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा जेवढा विकास आम्ही केला ती करण्याची विरोधकांमध्ये धमक नाही. शेतकऱ्यांचे काही प्रश्न केंद्राकडून सोडवून आणावे लागतात. विकासासाठी निधी खेचून आणावा लागतो. महाविकास आघाडीला निवडून दिल्यास त्यांचे उत्तर ठरलेले राहणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

अजित दादांनी दिला धीर

केंद्रात आपले सरकार नाही, आमचे तिथे कोणी ऐकतच नाही, अशी उत्तरे देऊन ते बोळवण करतील. संविधान बदलणार, अशी भीती दाखवून लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांनी तुमची मते घेतली अन दिशाभूल केली. आताही केंद्रात मोदी यांचेच सरकार आहे. संविधानाला कोणी हात लावलेला नाही. आम्ही जय हिंद आणि जय भीम म्हणणारे आहोत. त्यामुळे कोणी घाबरून जाण्याचे कारण नाही. कोणालाही एकटे सोडणार नाही, असा धीरही यावेळी अजित पवार यांनी कार्यक्रमाला आलेल्या दलित, मुस्लिम, आदिवासी बांधवांना दिला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.