"अक्षय शिंदे याची जी हत्या झाली..", जितेंद्र आव्हाडांनी शेअर केलेल्या ऑडिओ क्लिपमुळे खळबळ
बदलापूरमधील दोन लहान मुलींवर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला आहे. स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केला, त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याचं ठाणे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
मात्र अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर विरोधक या कारवाईबाबत आणि पोलिसांच्या भूमिकेबाबत सातत्याने संशय व्यक्त करत आहेत. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ऑडिओ क्लिप शेअर केली आहे. या ऑडिओ क्लिपमुळे अक्षय शिंदेचा एन्काऊंटर नेमका कसा झाला याबाबत पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत.
जितेंद्र आव्हाड यानी ट्वीट करत म्हटलंय की, "अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला आता एन्काऊंटर म्हणून संबोधले जाते आहे; ती कुठे झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका... निदान एखादी कथा सांगताना ती खोटी आहे, हे उघडकीस येणार नाही, याची तरी काळजी पोलिसांनी घ्यायला हवी होती."
अक्षय शिंदेचा एन्काऊंटर नाही तर हत्या झाली असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड करत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी एक ऑडिओ क्लिप शेअर केली आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचा प्रत्यक्षदर्शी असल्याचं सांगत आहे. तसेच अक्षय शिंदेचा एन्काऊंटर कसा झाला आणि कुठे झाला याची माहिती देत आहे. 'एनडीटीव्ही मराठी' या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.
ऑडिओ क्लिपमध्ये दोन व्यक्तींचं संभाषण आहे. त्यातील एक प्रत्यक्षदर्शी असल्याचा दावा करत आहे. हे दोन्ही व्यक्ती कोण आहेत, याची माहिती मिळू शकलेली नाही. ऑडिओ क्लिपमधील कथित प्रत्यक्षदर्शी सांगत आहे की, "अक्षय शिंदे ज्या पोलीस व्हॅनमध्ये होता, त्यामागेच त्याची गाडी होती. पोलीस व्हॅनला पडद्याने झाकण्यात आलं होतं. मात्र गाडी धावत असताना अचानक तीन मोठे आवाज झाले. मला वाटलं की गाडीच्या काही पार्ट्सचा आवाज झाला असेल. त्यामुळे मी दुर्लक्ष केले. मात्र काही वेळाने मी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर झाल्याची बातमी पाहिली. मात्र मी भीतीपोटी कुणालाही याबाबत काहीच सांगितलं नाही."जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेल्या ऑडिओ क्लिपनंतर आता काय राजकीय प्रतिक्रिया उमटतात हे पाहावं लागले. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरच्या तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याची याचिकेत मागणी करण्यात आली आहे. या एसआयटीकडून एन्काऊंटर प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. यापूर्वी एन्काऊंटरवर मुंबई उच्च न्यायालयानेही उपस्थित सवाल उपस्थित केले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.