राहुल गांधींच्या जिभेला चटकेच दिले पाहिजे... आमदार गायकवाडांनंतर आता भाजपच्या 'या' नेत्याने थेट...
अमरावती : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस देऊ, अशी प्रक्षोभक घोषणा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केली होती, त्यावर प्रतिक्रिया उमटत असतानाच भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
डॉ. बोंडे म्हणाले, राहुल गांधी यांची जीभ छाटण्याची भाषा करणे योग्य नाही, पण आरक्षणाबद्दल राहुल गांधी जे काही बोलले ते भयानक आहे. त्यामुळे असे कुणी विपरित बोलत असेल, परदेशात जाऊन असे कुणी वात्रटासारखे बोलत असेल, तर जीभ छाटू नये, मात्र त्याच्या जिभेला नक्कीच चटके दिले पाहिजे. अशा लोकांच्या जिभेला चटके देणे अत्यंत आवश्यक आहे. ते राहुल गांधी असोत, किंवा ज्ञानेश महाराव असोत किंवा श्याम मानव असोत.
डॉ. बोंडे यांनी यापूर्वीही अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी ‘मोदी गावगुंड’ असे वक्तव्य केले होत. त्यावर नानांचा पंजा तोडून टाकण्याचे वक्तव्य डॉ. बोंडे यांनी केले होते. मोदींना मारण्याची भाषा करणारे नाना शाहिस्तेखान आहेत. वेळ आली तर त्यांच्या हाताची बोटेच नाही तर हाताचा पंजा तोडून टाकू. लोक निघाले आहेत, आपला पंजा सांभाळून ठेवा, अशी धमकी डॉ. बोंडेनी दिली होती.डॉ. बोंडे यांच्या या प्रक्षोभक विधानावर विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यशोमती ठाकूर म्हणाल्या, डॉ. अनिल बोंडे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांनी मनोरुग्णालयामध्ये भरती झाले पाहिजे. एखादा अडाणी माणून बोलला तर आपण म्हणू तो अडाणी आहे. पण, हे तर डॉक्टर आहेत. तरीही अशी बेताल वक्तव्ये करीत आहेत. डॉ. बोंडे हे बेअक्कल, मूर्ख आहेत. त्यांना शांतताप्रिय महाराष्ट्रात दंगल घडवायची आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा लोकांना आवर घालायला हवा. पण, मुळात फडणवीस हेच अशा लोकांना प्रवृत्त करतात, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे. अशा प्रक्षोभक वक्तव्याबद्दल महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. महाराष्ट्राची शांतता बिघडवण्याचे काम हे लोक करत आहेत. यांना अजिबात महाराष्ट्र माफ करणार नाही, असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.