कोल्हापूरकरांचे हृदय होतेय कमकुवत!
कोल्हापूर : बदलती जीवनशैली, अयोग्य आहार, वाढता ताणतणाव, प्रदूषण, मद्यपान, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन या कारणांमुळे सध्या एकूण आजारापैकी 60 टक्के रुग्ण हृदयरोगाने त्रस्त आहेत. महिन्याला 125 कोटींहून अधिक रुपयांची औषधे लागत आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस हृदय विकाराच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होणे ही धोक्याची घंटा आहे. विशेष म्हणजे तरुणांमधील हृदयविकाराचे प्रमाण चिंताजनक आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगभरात हृदयरोगामुळे दरवर्षी 18 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. भारतात हृदयरोगामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 27 टक्के आहे. 40 ते 69 वयोगटातील नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण 45 टक्के आहे. पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करणार्या तरुणाईची जीवनशैली बदलली आहे. जागरण, धूम्रपान, मद्यपानसह मसालेदार पदार्थ खाण्याकडे कल वाढला आहे. यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल, वाढून ते हृदयाच्या धमन्यांमध्ये जमा होतेे. त्यामुळे धमन्यांमधील पडदा कमकुवत होऊन तो फाटल्याने कोलेस्टेरॉल, रक्ताच्या संपर्कात येऊन रक्ताच्या गाठी तयार होतात. यामुळे हृदयविकाराचा आजार उद्भवतो. जगभरात अशा प्रकारे मृत्युमुखी पडणार्या तरुणांचे प्रमाण 10.3 टक्क्यांवर पोहोचले आहे. 50 वयोगटापेक्षा खालील वयोगटातील अचानक हृदयविकाराचा झटका येऊन उपचाराची कोणतीही संधी न देता मृत्युमुखी पडणार्या तरुणांचे प्रमाण 21 टक्क्यांवर आहे. 30 ते 40 वयोगटातील तरुणांमध्ये या आजाराचे प्रमाण 13 टक्क्यांनी वाढले आहे.
कोल्हापुरात प्रमाण का वाढते?
कोल्हापुरात एकूण आजारामध्ये 60 टक्के आजार हे हृदयाशी संबंधित असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. उच्च रक्तदाब आणि हृदय रोगी वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे चटपटीत तांबडा-पांढरा रस्सा व अन्य पदार्थ होय. येथील नागरिक मसालेदार पदार्थांचे अधिक सेवन करतात. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात ब्लडप्रेशर आणि हृदय रोगाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत.
हृदयरोगाची लक्षणे
छातीत दुखणे, विनाकारण घाम येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, उलटी, चक्कर येणे, पाय सूजणे, मान जबडा दुखणे.
हृदयरोग टाळण्यासाठी
दररोज नियमित योगासने करणे, ध्यानधारणा, व्यायाम करणे आवश्यक आहे. पुरेशी झोप घेणे, फळे व सकस आहार, पालेभाज्या खाण्यावर भर द्यावा, धूम्रपान, मद्यपान, तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन टाळावे. सात तासांची झोप आवश्यक आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.