Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! विधानसभा निवडणुकीचा बिगुल 'या' महिन्यामध्ये, मतदान दिवाळीनंतर, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी बोलावली आज व उद्या बैठक; 'या' बाबींचा होणार आढावा

Big Breaking! विधानसभा निवडणुकीचा बिगुल 'या' महिन्यामध्ये, मतदान दिवाळीनंतर, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी बोलावली आज व उद्या बैठक; 'या' बाबींचा होणार आढावा
 

निवडणुकीच्या दीड-दोन महिने अगोदर सर्व जिल्ह्यातील तयारीचा आढावा घेतला जातो. मतदार याद्या अंतिम झाल्या, ईव्हीएमची प्रथमस्तरीय तपासणी झाली, मतदान केंद्रे निश्चित झाली, सहायक निवडणूक अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण झाले, निवडणुकीसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी तयार झाली.

या पार्श्वभूमीवर आता आज सर्व जिल्ह्यांमधील उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची मुंबईत मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी बैठक बोलावली असून उद्या शुक्रवारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होईल. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता जाहीर होऊन दिवाळीनंतर मतदान होईल, अशी शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

२०१९ मध्ये राज्यातील २८८ जागांसाठी एकाचवेळी २१ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले होते. त्यानंतर २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर झाला. परंतु, राजकीय नाट्यमय घडामोडींमुळे सत्ता स्थापन करण्यासाठी २३ नोव्हेंबरची पहाट उजाडली.

तोवर राज्यात राष्ट्रपती राजवट होती. पहाटेच्या शपथविधीनंतर ते सरकार कोसळले आणि पुन्हा नवीन समिकरणांची जुळणी करून महाविकास आघाडीचे सरकार राज्यात बसले. दरम्यान, आता २३ नोव्हेंबरपूर्वी सरकार स्थापन न झाल्यास राज्यात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू शकते. ही बाब महायुती सरकारला परवडणारी नाही. आता ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना, महिलांसाठी लाडकी बहीण योजना, युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना,

वृद्धांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना याशिवाय मुलींना मोफत उच्चशिक्षण, अशा योजनांमधून राज्य सरकारने सर्वच घटकांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणूक वेळेत झाल्यास आपल्यालाच लाभ होईल, असा विश्वास सत्तेतील काही घटकांना आहे.

दुसरीकडे मागील दोन-तीन निवडणुका हरियाणासोबत झाल्या, पण आता निवडणूक लांबणीवर पडल्याने सरकारवर टीका होवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर २३ नोव्हेंबरपूर्वी निवडणूक घेण्यासाठी हालचालींना वेग आला आहे.
'या' बाबींचा होणार आढावा

मतदान केंद्रे निश्चिती व अंतिम मतदार यादी, ईव्हीएमची संख्या, प्रथमस्तरीय चाचणी, उपलब्ध पोलिस बंदोबस्त, निवडणूक कामासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी, मतदान साहित्य व मतमोजणीची तयारी

आज मुंबईत आढावा बैठक

निवडणुकीपूर्वी साधारणत: दीड-दोन महिने अगोदर तयारीचा आढावा घेतला जातो. ईव्हीएमसह अंतिम मतदार यादी, निवडणूक कर्मचारी, पोलिस बंदोबस्त अशा विविध बाबींचा आढावा होतो. आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वच उपजिल्हाधिकाऱ्यांची (निवडणूक) बैठक बोलावण्यात आली आहे.- गणेश निऱ्हाळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर(स्रोत;सकाळ)

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.