Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नितीन गडकरींनी पायाभरणी केलेल्या 272 कोटींच्या प्रकल्पाला कंगना रणौतचा विरोध

नितीन गडकरींनी पायाभरणी केलेल्या 272 कोटींच्या प्रकल्पाला कंगना रणौतचा विरोध
 

हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून निवडून आलेली भाजप खासदार कंगना रणौतने केंद्र सरकारच्या एका प्रकल्पाला विरोध सुरु केलाय. रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सहा महिन्यांपूर्वी हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथील खरहाल व्हॅलीमध्ये बिजली महादेव रोपवेची घोषणा केली होती.

मात्र अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत हिने २७२ कोटींच्या या प्रकल्पाला विरोध केलाय. बिजली महादेव मंदिराच्या रोपवेबाबत खरहाल आणि काशावरी खोऱ्यातील लोकांचा विरोध आहे. बिजली महादेव रोपवेच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी अनेकवेळा रस्त्यावर उतरून आंदोलन केलंय. रोपवे बांधल्याने देव खूश नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रोपवे बांधल्यामुळे त्यांच्या रोजगारावर देखील मोठा परिणाम होईल असंं स्थानिक लोकांचं मत आहे. या रोप वेच्या बांधकामात अनेक झाडे तोडली जाणार असल्याने पर्यावरणाचीही हानी होणार आहे.

नितीन गडकरी यांची भेट घेणार
रोप वे प्रकल्पाबाबत मी नितीन गडकरी यांना भेटल्याचं देखील कंगना राणौतने सांगितले. त्यांना याबाबत माहिती दिली गेलीय. आमच्या देवांना नको असेल तर हा प्रकल्प थांबवावा. मी पुन्हा नितीन गडकरी यांना भेटणार आहे. आधुनिकीकरणापेक्षा आपल्या देवाचे आदेश अधिक महत्त्वाचे आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते हिमाचलमधील कुल्लू येथील मोहल नेचर पार्क येथे बिजली महादेव रोपवेची पायाभरणी झाली होती. हा रोपवे दीड वर्षात बांधला जाणार आहे. या रोपवेची निर्मिती झाली तर एका दिवसात 36 हजार पर्यटक बिजली महादेवापर्यंत सहज पोहोचतील आणि येथील पर्यटनाला मोठा फायदा होईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. या रोपवेमुळे भाविकांना त्याचा मोठा उपयोग होईल, असा दावा करण्यात आलाय. सध्या पर्यटकांना 2 ते 3 तासांचा प्रवास करून बिजली महादेव येथे जावे लागते. मात्र रोपवेद्वारे पर्यटकांना अवघ्या सात मिनिटांत बिजली महादेवापर्यंत पोहोचता येणार आहे.

रोपवे बांधण्याचे काम करणाऱ्या नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेडचे ​​व्यवस्थापक अनिल सेन यांनी सांगितले की, बिजली महादेवचा हा रोपवे मोनो केबल रोपवे असेल आणि त्यात ५५ बॉक्स बसवले जातील. एका तासात 1200 लोकांना वाहून नेण्याची क्षमता यात असेल. नंतर ही क्षमता 1800 पर्यंत वाढवली जाईल.
बिजली महादेवाची काय कथा

बिजली महादेव मंदिर कुल्लू खोऱ्यातील काशवारी या सुंदर गावात वसलेले आहे. हे मंदिर 2460 मीटर उंचीवर आहे. भारतातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे आणि त्याच्या नावामागील कारण अतिशय अनोखे आहे. दर 12 वर्षांनी मंदिरात बसवलेल्या शिवलिंगावर वीज पडते आणि त्यानंतर शिवलिंगाचे तुकडे होतात असे म्हणतात. यानंतर पुजारी हे तुकडे गोळा करतात आणि त्यांना डाळीचे पीठ, धान्य आणि लोणी इत्यादींची पेस्ट घालून जोडतात. या मंदिराची महिमा खूप जास्त आहे. त्यामुळे देश-विदेशातून लोक येथे दर्शनासाठी येतात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.