आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि पक्षाच्या प्रवक्त्या दिशा पिंकी शेख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीने पहिल्यांदाच एका तृतीयपंथी उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून, जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघातून शमिभा पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात असणाऱ्या रावेर विधानसभा मतदारसंघातून लेवा पाटील समुदायाच्या शमीभा पाटील यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात एखाद्या मुख्यप्रवाहातील पक्षाने प्रथमच तृतीयपंथी व्यक्तीला विधानसभेची उमेदवारी दिली आहे. सिंदखेड राजामधून सविता मुंडे यांना उमेदवारी देण्यात आलेली असून, त्या वंजारी समाजाच्या असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
'उमेदवारांना प्रचाराची संधी मिळावी म्हणून लवकर घोषणा'
वंचितच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "लोकसभेच्या निवडणुकीत पैशाचा महापूर आलेला आम्ही बघितला. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी पुरेसा कालावधी मिळावा म्हणून आम्ही ही उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत आहोत.
"यासोबतच चोपडा मतदारसंघातून भारत आदिवासी पार्टीचे उपाध्यक्ष अमित जाधव हे निवडणूक लढवणार आहेत आणि, हरीश उईके हे नागपूरच्या रामटेक मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. रामटेक ही आरक्षित जागा नाही, तरीही तिथून आदिवासी समुदायाचे हरीश उईके ही निवडणूक लढवणार आहेत."
वंचित बहुजन आघाडीने पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली
कोण आहेत तृतीयपंथी उमेदवार शमिभा पाटील?आंबेडकर पुढे म्हणाले की, "वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्षांचा संयुक्त जाहीरनामा निवडणुकीच्या अगोदर आम्ही प्रसिद्ध करणार आहोत. विकास आणि रोजगार यावर चर्चा व्हावी म्हणून आम्ही हा जाहीरनामा प्रकाशित करणार आहोत. आरक्षण आणि धार्मिकता यातून बाहेर पडून पुढची पाच वर्षे विकास आणि रोजगार यावर चर्चा व्हावी म्हणून आम्ही हा जाहीरनामा प्रकाशित करणार आहोत."उमेदवारांबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "उमेदवारीच्या माध्यमातून सामाजीकरण करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. याचा हेतू हा आहे की, प्रत्येक पक्षाचं एकजातीय राजकारण मोडून काढण्यासाठी आम्ही सर्व समुदायातील उमेदवारांना संधी देण्याचं ठरवलं आहे. आम्ही यातून लेवा पाटील, लोहार, वडार, मुस्लिम, लिंगायत, मराठा, पारधी अशा सर्व समाजाच्या उमेदवारांना संधी दिली आहे."
रावेर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार शमिभा पाटील या उच्चशिक्षित असून, सध्या त्या मराठी साहित्यात पीएचडी करत आहेत. शमिभा पाटील या जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात असणाऱ्या फैजपूरच्या रहिवासी आहेत.
वंचित बहुजन आघाडीने रावेर मतदारसंघातून उमेदवारी दिलेल्या शमिभा पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "मागच्या काही वर्षांमध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केलेल्या मेहनतीला आमच्या पक्षाने उमेदवारी देऊन न्याय दिला आहे. एक तृतीयपंथी व्यक्ती म्हणून राजकारणात एक सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्न असेल. येणाऱ्या निवडणुकीला संपूर्ण तयारीनिशी तोंड देणार आहे. माझ्या शिक्षणाचा आणि राजकीय-सामाजिक कामांचा फायदा भविष्यात करण्याचा माझा प्रयत्न असेल."
अशी आहे 11 उमेदवारांची पहिली यादी
रावेर (जळगाव) - शमीभा पाटीलX/@VBAforIndiaवंचित बहुजन आघाडीने उमेदवारांच्या जातींचाही यादीत उल्लेख केला आहे.
सिंदखेड राजा (बुलडाणा) - सविता मुंडे
वाशिम - मेघा किरण डोंगरे
धामणगाव रेल्वे (अमरावती) - निलेश टी. विश्वकर्मा
नागपूर दक्षिण पश्चिम - विनय भांगे
साकोली (भंडारा) - डॉ. अविनाश नान्हे
नांदेड दक्षिण - फारुख अहमद
लोहा (नांदेड) - शिवा नरांगळे
औरंगाबाद पूर्व - विकास रावसाहेब दांडगे
शेवगाव (अहमदनगर) - किसन चव्हाण
खानापूर (सांगली) - संग्राम माने
'वंचित' तिसऱ्या आघाडीत का सहभागी झाली नाही?
तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "आमच्यासोबत आघाडी करायची की नाही हे राजू शेट्टींनी ठरवायची आहे. त्यानुसार आमची चर्चा सुरु आहे. बच्चू कडू यांच्यासोबत आम्ही जाऊ शकत नाही. त्यामुळे प्रादेशिक पातळीवर आघाडीची चर्चा झाली तर आम्ही ती नक्कीच करू. प्रकाश शेंडगे यांच्यासोबत आमची कसलीही चर्चा झालेली नाही."प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "राज्यभरातील ओबीसी संघटनांनी आमच्याशी संपर्क केला आहे. त्यादृष्टीने आम्ही तयारी आणि चर्चा करत आहोत. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि प्राध्यपक वाघमारे यांच्याशी चर्चा झालेली आहे."
यशवंत मनोहर, रावसाहेब कसबे आणि इतर लेखक, विचारवंतांच्या विरोधात सम्यक विद्यार्थी आघाडीने केलेल्या आंदोलनाबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "सामान्य माणसाने आणि आरक्षणवादी कार्यकर्त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून त्यांचं व्यक्त केलं आहे. मी पक्ष म्हणून या आंदोलनाकडे सकारात्मक दृष्टीने बघतो."
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.