Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुणे :-हनी ट्रॅप टोळीचा म्होरक्या निघाला ' PSI ' चं

पुणे :-हनी ट्रॅप टोळीचा म्होरक्या निघाला ' PSI ' चं 
 

पुणे :- हनी ट्रॅप टोळीमध्ये शहर पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षकाचा (पीएसआय) सहभाग असल्याचे आढळून आले आहे. काशिनाथ मारुती उभे (वय ५५) असे पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. टोळीतील महिलांना अटक केल्याची चाहूल लागताच उभे याने पळ काढला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, यापूर्वी विश्रामबाग पोलिसांनी, टोळीतील तीन महिलांना १ ऑगस्ट रोजी अटक केली. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यातील एका महिलेवर कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलिस ठाण्यात डॉक्टरला ५० लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले, टोळीने अशाप्रकारे आणखी काही जणांना जाळ्यात खेचून लुटल्याचा संशय आहे. 

बदनामीच्या भीतीपोटी त्यांनी तक्रारी दिल्या नसल्याची माहिती आहे. याप्रकरणी ६४ वर्षीय नागरिकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, विश्रामबाग पोलिसांनी तीन महिला आणि एका पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. हा प्रकार २९ जुलै रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास अलका टॉकीज चौकातील सदाशिव पेठेतील लॉजमध्ये घडला. 

असे फुटले टोळीचे बिंग

दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्रामबाग पोलिसांच्या तपास पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक मनोज बरुरे तपास करत होते. ज्या लॉजवर हा प्रकार घडला तेथील रजिस्टर आणि सीसीटीव्ही फुटेज बरुरे यांनी तपासले. त्या वेळी फिर्यादीसोबत प्रथम ओळख करणाऱ्या एका महिलेच्या आधार कार्डची माहिती हाती लागली. तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये गुन्ह्यात वापरलेली गाडी दिसून आली. 

कोथरूड परिसरातून तिघा आरोपी महिलांना ताब्यात घेतले. तर दुसरीकडे गाडीची माहिती घेतील तेव्हा ती मुळशी तालुक्यात एका व्यक्तीच्या नावावर असल्याचे दिसून आले. त्याची चौकशी केली तेव्हा ती गाडी पोलिस अधिकारी उभे वापरत असल्याचे समजले. आरोपी महिलादेखील याबाबत काही बोलत नव्हत्या. मात्र, बरुरे यांनी कौशल्यपूर्वक तपास करत महिलांना बोलते केले. त्या वेळी त्यांनी त्यांच्यासोबत असलेली व्यक्ती पोलिस उपनिरीक्षक काशिनाथ उभे असल्याचे सांगितले.

पाहा, नेमका कसा घडला प्रकार?
याबाबत बोलताना पोलिस सांगतात, की फिर्यादी ज्येष्ठ नागरिक एका खासगी कंपनीतून निवृत्त आहेत. एका महिलेने त्यांच्याशी ओळख करून घेतल्यानंतर आजारी असल्याचे सांगत उपचारासाठी दोनदा पैसे घेतले. हॉटेलमध्ये जेवण करताना त्यांना सोमवारी दुपारी अलका टॉकीज चौकातील एका लॉजवर बोलावून घेतले. थोड्या वेळ गप्पा मारल्यानंतर रूममध्ये दोन महिला आणि एक पुरुष घुसले. 

त्यांनी महिला हक्क संरक्षण समितीच्या सदस्या, तर पुरुषाने पोलिस असल्याचे सांगत चापटी मारण्यास सुरुवात केली. तसेच अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तेव्हा सोबत असलेल्या महिलेनेदेखील कांगावा केला. यानंतर ज्येष्ठाकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी केली. तडजोडीअंती तीन लाख द्यायचे ठरले. ज्येष्ठाच्या खिशातील २० हजार रु. काढून घेतले. तसेच एटीएममधील ६० हजार काढण्यासाठी त्यांना कारमध्ये कोंबून कर्वे पुतळ्याजवळ नेले. 

तेथे एका सराफी दुकानात अंगठी विकायला लावली. मात्र, दुकानदाराने बदल्यात सोने घ्यावे लागेल असे सांगितल्याने तो डाव फसला. यानंतर ज्येष्ठाला एटीएम सेंटरमध्ये पाठवले. परंतु त्याने चुकीचा पिन टाकल्याने पैसे निघाले नाहीत. यामुळे त्यांना मारहाण करत घरातून चेक आणून देण्यास सांगितले. तसेच मोबाईल फोनही काढून घेतला. ही संधी साधत ज्येष्ठाने पुढील चौकातून रिक्षा पकडत पळ काढला.
छापा मारणारा तो पोलिस अधिकारी

'उभे' पोलिस उपनिरीक्षक उभे हा गुन्ह्याच्या संपूर्ण कटात सहभागी असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. लॉजवरील खोलीत प्रवेश करणारा पोलिस हा उभे होता. तर महिला हक्क संरक्षण समितीच्या सदस्या इतर दोन आरोपी महिला होत्या. उभे यानेच फिर्यादीला दम भरला, उभे याने पोलिस असल्याचा धाक दाखवून मारहाण केली. तर फिर्यादी ज्येष्ठखला ज्या गाडीतून डांबून घेऊन जाण्यात आले, ती गाडी उभे याचीच होती. सुरुवातीपासून शेवटपर्यंत उभे हा हनी ट्रॅप टोळीत सहभागी होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.