Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'चंद्रचूडसाहेब गुदमरल्यासारखे वाटतात, त्यांचे गुदमरणे देशाला महागात पडेल! कोणाचे...'

'चंद्रचूडसाहेब गुदमरल्यासारखे वाटतात, त्यांचे गुदमरणे देशाला महागात पडेल! कोणाचे...'
 

"आपली न्यायव्यवस्था म्हणजे एक त्रांगडेच होऊन बसले आहे. त्यामुळे न्यायदेवतेसही शेख हसीनाप्रमाणे पळून जावे असेच वाटत असावे. कारण ज्यांनी निर्भयपणे न्याय करावा, अशी अपेक्षा देश करतो ते तथाकथित रामशास्त्रीच गर्भगळीत अवस्थेत थातूरमातूर न्यायदान करीत असतात. त्यामुळे देशाचे संविधान, कायदा धोक्यातच आले आहे," अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे गटाने शिवसेनेसंदर्भातील याचिकेची सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आल्यासंदर्भात नाराजी व्यक्त करताना म्हटलं आहे.

आपले सरन्यायाधीश चिडले व म्हणाले...

"शिवसेना आमदारांच्या अपात्रतेशी संबंधित खटला सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर किमान तीनेक वर्षे सुरू आहे व त्यात रोजच 'तारीख पे तारीख'चे नवे बुद्धिबळ खेळले जाते. शिवसेना वकिलांनी सहा तारखेस अत्यंत विनम्रपणे न्यायालयास सांगितले की, ''माय लॉर्ड, आम्हाला थोडी जवळची तारीख देता का? कुणी जवळची तारीख देता का तारीख?'' यावर आपले सरन्यायाधीश चिडले व म्हणाले, ''एक दिवस इथे माझ्या जागेवर बसा. मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की, तुम्ही तुमचा जीव मुठीत घेऊन पळून जाल.'' सरन्यायाधीशांचे हे विधान आपल्या न्याययंत्रणेची हतबलता दर्शविणारे आहे," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

...तर संविधानाचे रक्षण कसे काय करणार?

"न्यायदानाचे काम हे संविधान किंवा कायद्याच्या रक्षणाचे काम आहे. म्हणजेच भारताचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्वाची सुरक्षाच सर्वोच्च न्यायालयाच्या हाती आहे. थोडक्यात, हे महान राष्ट्रसेवेचे कार्य आहे. हे कार्य करताना सरन्यायाधीशांना असे डचमळून कसे चालेल? 'माझ्या खुर्चीवर येऊन बसा. पळून जाल', असे त्यांनी सांगणे याचा अर्थ संबंधित खटल्याचा निकाल कायद्याच्या अंगाने, निष्पक्षपणे देऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयावर दबाव आहे असेच लोकांना वाटेल. अशा दबावाखालची न्याययंत्रणा संविधानाचे रक्षण कसे काय करणार?" असा सवाल 'सामना'मधून उपस्थित करण्यात आला आहे.

डचमळून जायचे कारण नाही
"एकतर न्यायमूर्तींनी त्यांचा हा पेशा स्वतःहून स्वीकारलेला आहे. कुणालाही धरून पकडून न्यायदानासाठी बसवलेले नाही. कायद्याचा, परिस्थितीचा साधकबाधक अभ्यास करूनच निकाल द्यावे लागतात. इतिहासात न्या. रामशास्त्र्यांनी प्रलोभने, दबाव, दहशतीची पर्वा न करता आपल्या मालकांना म्हणजे राघोबा पेशव्यांना देहांत शासनाची सजा सुनावलीच होती व त्याच रामशास्त्री बाण्याचा आदर्श व अभिमान महाराष्ट्र आजही सांगतो. देशाच्या सरन्यायाधीशांना महाराष्ट्राच्या या महान न्यायदान परंपरेविषयी सांगण्याची गरज नाही. कारण त्याच रामशास्त्र्यांच्या भूमीतून ते सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहेत. पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांचे पद गमवावे लागले, असा निकाल अलाहाबाद हायकोर्टाच्या बेडर व निर्भय न्यायमूर्तींनी दिला आहे व त्या न्यायमूर्तींचा कुणी बालही बाका करू शकले नाही. त्यामुळे सध्याच्या न्यायवृंदाने असे डचमळून जायचे कारण नाही," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
न्याय मागायचा नाही काय?

"निवृत्तीनंतर आपल्याला एखादे पद, गाडी-घोड्याची व्यवस्था व्हावी, असे ज्यांना वाटते असेच लोक कर्तव्य बजावत असताना डचमळतात व त्यामुळे देशाचे अतोनात नुकसान होते. कोणत्याही देशात अशी डचमळणारी न्यायव्यवस्था निर्माण झाली की, जनतेच्या सहनशीलतेचा कडेलोट होतो. असा कडेलोट झाल्यामुळे बांगलादेशातील जनता संसद व सर्वोच्च न्यायालयात घुसली आहे," असा उल्लेख या लेखात आहे. "सरन्यायाधीशांसमोर शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत खटला सुरू आहे व उद्या नवी विधानसभा अस्तित्वात आल्यावर हे खोकेबाज आमदार अपात्र ठरणार काय? असा प्रश्न जनतेला पडला आहे. ज्या पद्धतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना व चिन्ह धनुष्यबाण ऐऱ्यागैऱ्या दाढीवाल्या नत्थूलालच्या हाती देऊन घटनेतील दहाव्या शेड्यूलचा मुडदा पाडला गेला त्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवून न्याय मागायचा नाही काय? हा न्याय वेळीच व्हावा, अशी अपेक्षा ठेवली तर न्यायालयाने असे डचमळून जाण्याचे कारण नाही," असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे.

नक्की काय घडतेय?

"आपले सरन्यायाधीश उत्तम भाषणे देतात व न्यायव्यवस्थेच्या दिरंगाईबाबत वारंवार चिंता व्यक्त करतात. अशी चिंता ज्यांना खरेच वाटते त्यांनी पळून जाण्याची भाषा का करावी? सरन्यायाधीश असे डचमळले तर मायबाप जनतेने कोणाकडून न्यायाची अपेक्षा करावी? देशातील राज्यव्यवस्था हुकूमशाही पद्धतीने सुरू आहे व राज्यव्यवस्थेने न्यायदानावर दबाव आणून हवे तसे राजकीय निर्णय मिळवले तर देशाचा स्वातंत्र्य लढा व संविधान वायाच गेले, असे जनतेला वाटेल. सरन्यायाधीशांची हतबलता हा देशाच्या चिंतेचा व कायद्याच्या चिंतनाचा विषय आहे. न्यायदेवतेस हे सर्व पाहून रडूच येईल, पण न्यायदेवते, तू रडू नकोस व पळूनही जाऊ नकोस. तुझ्या उद्धाराचा दिवस जवळ आला आहे, असे भारतीय जनता तिला आत्मविश्वासाने सांगू इच्छिते. सरन्यायाधीश चंद्रचूडसाहेब थोडे गुदमरल्यासारखे वाटतात. त्यांचे हे गुदमरणे देशाला महाग पडेल. माय लॉर्ड, नक्की काय घडतेय? कोणाचे दाबदबाव सुरू आहेत तेवढे निर्भयपणे देशाला सांगा," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.