Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ज्या राज्याने तुला मोठं केलं त्याला... जेव्हा आर आर आबांनी अमिताभ बच्चन यांना झापलेलं; वाचा तो किस्सा

ज्या राज्याने तुला मोठं केलं त्याला... जेव्हा आर आर आबांनी अमिताभ बच्चन यांना झापलेलं; वाचा तो किस्सा
 

आधुनिक महाराष्ट्राचे नेते म्हणून ओळख असलेले लोकप्रिय राजकारणी रावसाहेब रामराव पाटील यांना संपूर्ण देश आर आर आबा म्हणून ओळखतो. त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःच्या चांगुलपणाची छाप पाडली. अत्यंत मुसद्दी राजकारणी म्हणूनही त्यांची ओळख आहे. १९९१ ते २०१५ पर्यंत ते तासगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. त्यांनी दोन वेळा महाराष्ट्राचे गृहमंत्री पद सांभाळलं. जनतेमध्ये ते कायमच त्यांच्या कामासाठी लोकप्रिय राहिले. आता त्यांच्याबद्दलचा एक किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होतोय जेव्हा ते खुद्द अमिताभ बच्चन यांना ओरडले होते.

एनसीपीए नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्टस् मध्ये एका कार्यक्रमादरम्यान घडलेला हा किस्सा आहे. आर आर आबा यांच्यासोबत काम केलेल्या गणेश जगताप यांनी बोल भिडूला दिलेल्या एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला आहे. गणेश मुलाखतीत बोलताना म्हणाले, 'एनसीपीएला सर्व राज्याच्या पर्यटन विभागाचा मेळावा भरलेला होता. स्टॉल्स होते. आम्ही एका संध्याकाळी त्या एनसीपीएच्या स्टॉलवर गेलो, आबांचा दिवस होता भेट देण्याचा त्या दिवशी तेव्हा समोर युपीचा स्टॉल होता. उत्तर प्रदेशचा स्टॉल होता. त्या स्टॉलवर प्रचंड गर्दी होती. बाकीच्या कुठल्या स्टॉलवर फारशी गर्दी नव्हती, महाराष्ट्राच्या स्टॉलवर गर्दी नव्हती.'
 
गणेश पुढे म्हणाले, 'त्यावर आबांनी विचारलं, तिथे एवढी गर्दी का आहे? अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांचे ब्रँड एम्बॅसिडर अमिताभ बच्चन आहेत आणि ते आलेत त्या ठिकाणी म्हणून गर्दी आहे. त्यांनी एकच प्रश्न विचारला की आपल्या महाराष्ट्राच्या स्टॉलवर ते आले होते का? त्यावर ते म्हणाले, नाही, त्यांचे ब्रँड एम्बॅसिडर आहेत म्हणून तिकडेच गेले. गाडीत बसल्यावर ते मला म्हणाले की अमिताभला फोन लाव. मी म्हणालो अहो ते अजून तिथेच आहेत. ते म्हणाले लाव तर खरं. मी त्यांच्या ऑफिसला फोन लावला आणि निरोप दिला की सरांना बोलायचं आहे.'

ते पुढे म्हणाले, 'त्यानंतर अमिताभचा फोन आला आणि त्यानंतर ते एक तीन ते चार मिनिटं आबा अमिताभला झापत होते की बाबा तुला या राज्याने एवढं सगळं दिलं, लोकप्रियता दिली, पैसे दिले, काम दिलं, एवढा मानसन्मान दिला, इथं राहून तू मोठा झालास आणि तुला एकदाही असं वाटलं नाही की आमच्या स्टॉलवर यावं. अवधी तुझी नैतिकता घसरली. आणि तिकडून अमिताभ वारंवार माफी मागत होता त्यांची की याच्यापुढे माझ्याकडून असं काही होणार नाही. कोण कितीही मोठा असुदे आबांनी राज्याच्या भल्यामध्ये कधीही कॉम्प्रोमाइज केलं नाही.'

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.