पैसे कमवण्याचा मोह नडला, सोन्याची बिस्किटे गेली; जीम ट्रेनरची फसवणूक
पैसा.. सगळ्यांनाच हवा असतो. कष्ट करून, काम करून बहुतांश लोक पैसे कमावतात. घाम गाळून मिळवलेला पसै सर्वांना प्रिय असतो, पण काहीजण मोहात पडून, स्वस्तात, सोप्या मार्गाने झटपट पैसा कमावण्यासाठी प्रयत्न करतात.
मात्र काहीवेळा झटपट पैसे कमावण्याचा हा मार्ग धोकादायक ठरू शकतो आणि मेहनतीच्या कमाईवर पाणी सोडावं लागू शकतं. अशीच एक दुर्दैवी घटना मुंबईत घडल्याचे उघडकीस आले आहे. स्वस्तात सोन्यातून पैसै कमावण्याचा मोह एका जिम ट्रेनरला चांगलाच महागात पडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित इसम हा विक्रोळीतील रहिवासी असून तो एक जिम ट्रेनर आहे. स्वस्तात पैसे कमावण्याचा मोह त्याला नडला आणि आयुष्यभराची कमाई त्याने एका झटक्यात गमावली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
अशी झाली फसवणूक
पीडित जीम ट्रेनरची दुसऱ्या इसमाशी ओळख झाली. सात लाख रुपये किमतीचे सोन्याचे बिस्किट सहा लाखांत देतो, असे सांगून त्याला फसवण्यात आले. विशेष म्हणजे, ही फसवणूक करताना, पोलिसांचा छापा पडल्याचे भासवण्यात आले. मात्र आपण तोतयांच्या सापळ्यात अडकलो असून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या ट्रेनरने अखेर पोलिसांत धाव घेतली.
व्यायामशाळेत प्रशिक्षण देणाऱ्या विक्रोळी येथील समीर (बदललेले नाव) याच्या मित्रांनी त्याला अनूप आणि हेमंत अग्रवाल नावाच्या व्यक्तींबाबत सांगितले. हे दोघे बाजारभावापेक्षा कमी दरात सोने देत असल्याचे त्यांनी सांगितले होते. 100 ग्रॅम सोन्याचे बिस्किट बाजारात सात लाखांपेक्षा अधिक दरात मिळते, मात्र तेच बिस्कीट हेमंत सहा लाखांत देत असल्याचे समीर याला सांगण्यात आले होते.
तसेच या सोन्यासाठी आपल्याकडे पैसे आहेत की नाही, याची खात्री करून द्यावी लागत असल्याची माहिती समीरच्या मित्रांनी त्याला दिली. सहा लाखांत बिस्कीट घेऊन ते बाजारात सात लाखांना विकल्यास एक लाख रुपये फायदा होईल, असा विचार करून समीर याने खरेदी करण्याची तयारी दर्शवली. त्याप्रमाणे त्याने खरेदी केली. मात्र नंतर फसवणूक झाली आणि त्याने सोन्याची बिस्कीटंही गमावली. अखेर पीडित इसमाने तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत .
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.