Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दारु पिताना सावधान! नाहीतर तुम्हीही जाल कोमामध्ये, काय आहे कारण?

दारु पिताना सावधान! नाहीतर तुम्हीही जाल कोमामध्ये, काय आहे कारण?
 

मद्यपान हे आरोग्यासाठी घातक आहे. हे माहिती असूनही मद्यपान करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही वेळा मद्यपान करतेवेळी प्रमाणापेक्षा जास्त दारू पिणं जिवावर बेतू शकतं.

जपानमध्ये अशाच प्रकारची एक घटना घडली. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने एक व्यक्ती कोमात गेली. तसंच त्याच्या फुफ्फुसात प्रमाणापेक्षा जास्त द्रव जमा झाला. डॉक्टरांच्या प्रयत्नाने त्याचे प्राण वाचले आहेत. जास्त प्रमाणात दारू पिणं त्याला भलतंच महागात पडलं. या प्रकाराची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

मद्यपान करणं हा काही लोकांचा शौक असतो; पण प्रमाणापेक्षा जास्त दारू पिणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. आपल्याला आपल्या पायाने सरळ चालता यावं एवढंच मद्यपान करावं, असं म्हटलं जातं. जपानमधल्या एका व्यक्तीनं प्रमाणापेक्षा जास्त मद्यपान केलं आणि तो कोमात गेला. डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे त्याचे प्राण वाचले आहेत.
31 वर्षांची एक व्यक्ती इजुनोकुनीमधल्या एका नाइट क्लबमध्ये पार्टी करत होती. पार्टीत त्याने टकीलाची 500 मिलिमीटरची पूर्ण बाटली संपवली. त्यानंतर तो शोचूचे (तिखट जपानी मद्य) आणखी दोन शॉट प्यायला. एवढं मद्यपान केल्यावर तो बेशुद्ध पडला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तपासणी केल्यावर तो कोमात गेल्याचं स्पष्ट झालं. तसंच त्याच्या फुफ्फुसांमध्ये मोठ्या प्रमाणात द्रव साचलं होतं.

डॉक्टरांनी सांगितलं, की 'त्याचा रक्तदाब सामान्य होता; पण त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. तसंच त्याच्या फुफ्फुसात आवाज येत होता. याचा अर्थ त्याच्या फुफ्फुसांमध्ये द्रव पदार्थ साचला होता. जास्त प्रमाणात दारू प्यायल्यास अशा प्रकारची स्थिती निर्माण होत असते.'

या व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मद्यपान केल्यावर या व्यक्तीने उलटी करण्याचा प्रयत्न केला होता; पण उलटी झाली नाही आणि द्रव त्याच्या फुफ्फुसात जमा झालं. त्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि तो कोमात गेला, असं डॉक्टरांनी सांगितलं.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे या व्यक्तीचा जीव वाचला. दुसऱ्या दिवशी तो शुद्धीवर आला आणि त्याच्या फुफ्फुसांची स्थिती सुधारली. तब्येतीत सुधारणा झाल्यावर तिसऱ्या दिवशी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.