Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कामगार मंत्री सुरेश खाडे यांना त्यांचा स्विय सहाय्यकच देणार आव्हान? मिरज मतदार संघात चर्चेला उधाण

कामगार मंत्री सुरेश खाडे यांना त्यांचा स्विय सहाय्यकच देणार आव्हान? मिरज मतदार संघात चर्चेला उधाण
 
 

सांगली : राज्याचे कामगार तथा सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांची राजकीय कोंडी करण्याचे प्रयत्न या विधानसभा निवडणुकीत सुरू असताना हा चक्रव्यूह ते कसा भेदतात याची उत्सुकता जिल्ह्याला लागली आहे. पक्षातूनच त्यांना त्यांचेच स्वीय सहायक प्रा. मोहन वनखंडे राजकीय आव्हान देण्याच्या प्रयत्नात असताना विरोधक म्हणून महाविकास आघाडीतील घटक पक्षांची भूमिका काय असणार हे पाहणेही महत्वाचे आहे. महायुतीतूनच वनखंडे उमेदवारीसाठी प्रयत्नशील असताना जर उमेदवारीच्या लढ्यात मंत्री खाडे प्रबळ ठरले तर त्यांच्यासाठी महाविकास आघाडीची दारे उघडली जातील का? जर सक्षम विरोधक म्हणून वनखंडेच समोर आले तर राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस या पक्षांतील इच्छुकांची काय भूमिका राहणार याकडे मतदार संघाचे लक्ष राहणार आहे.

मिरज विधानसभा मतदार संघ २००९ च्या निवडणुकीपासून राखीव झाला आहे. तेव्हापासून या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व मंत्री सुरेश खाडे करत आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रात विशेषत: काँग्रेसचा बालेकिल्ला समजंल्या जाणार्‍या सांगली जिल्ह्यात त्यांनी २००५ मध्ये जत मतदार संघात पहिल्यांदा विजय मिळवून भाजपचे कमळ फुलविले होते. यानंतर जत मतदार संघ सर्वसाधारण होताच मिरजेत येउन आपले राजकीय बस्तान बसविले. यासाठी त्यांना मिरजेत झालेल्या दंगलीची पार्श्‍वभूमीही मिळाली. यानंतर सलग तीन निवडणुका लिलया जिंकल्या. असंघटित विरोधक हाच त्यांचा विजयाचा मंत्र ठरला असला तरी आजही त्याच भरवशावर त्यांची निवडणुकीची रणनीती आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तथापि, राज्यात सत्ताबदल होताच मंत्रीमंडळात त्यांना पहिल्या टप्प्यात संधी मिळाली. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गेली दोन वर्षे ते काम करत आहेत.
पालकमंत्री होताच खाडे यांची राजकीय कोंडी करण्याचे प्रयत्न पडद्याआड सुरूच आहेत. यामागे मी आणि माझे कुटुंब ही त्यांची भूमिका फारशी मतदारांना रूचलेली दिसत नाही. गेली दोन दशके सोबत असलेले स्वीय सहायक प्रा. वनखंडे यांच्याशी त्यांचा सवता सुभा का निर्माण झाला यामागे कोणत्या शक्ती कार्यरत होत्या, हे पुढे आले नसले तरी गेल्या एक वर्षात दोघामध्ये मोठा दुरावा निर्माण झाला आहे. त्यांच्याकडे असलेले भाजपचे प्रचार प्रमुख पद काढून घेण्यात आले. मात्र, पक्षाच्या संघटनेत असलेले अनुसिूचत जाती जमाती सेलचे प्रदेश सरचिटणीस पद कायम आहे. या माध्यमातून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांची जवळीकही वाढती आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या माध्यमातून पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात वनखंडे यांचा वाढता संपर्क मंत्री खाडे यांच्यासाठी अडचणीचा ठरू लागला आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे मतदान कमी झाले आहे. पालकमंत्र्यांचा मतदार संध असूनही २५ हजार मतदान कमी झाले आहे. ही मतांची वजाबाकी बेरजेत रूपांतर करण्यासाठी सध्या मंत्री खाडे मतदारांशी थेट संवाद साधत असून जिल्ह्यात आल्यानंतर त्यांची पहिली धाव ही मतदार संघ आणि जनसंपर्क कार्यालयाकडे असते. विविध विकास कामांची उद्घाटने करण्याच्या निमित्ताने लोकसभेतील पक्षाची झालेली पीछेहाट भरून काढण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

प्रा. वनखंडे यांनीही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले असून पक्ष संघटना, कार्यकर्त्यांशी असलेला थेट संवाद या जमेच्या बाजू घेउन ते उमेदवारीसाठी आग्रही राहतील असे दिसते. मात्र, गेल्या महिन्यात त्यांच्या घरगुती कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व राजकीय नेतेमंडळींची उपस्थिती भुवया उंचावणारी ठरली आहे. अगदी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, काँग्रेस नेते आमदार डॉ. विश्‍वजित कदम, जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे, खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजयकाका पाटील यांची उपस्थिती खाडे यांच्यादृष्टीने चिंतेची बाब ठरण्याची चिन्हे आहेत.
मिरजेची उमेदवारी विद्यमान आमदार व मंत्री म्हणून खाडे यांनाच मिळण्याची चिन्हे सध्या तर दिसत असली तरी विरोधक कोण असणार, प्रा.वनखंडे कोणती भूमिका घेणार हे भविष्याच्या उदरात दडले असले तरी राजकारणात काहीही घडू शकते हा सिध्दांत रूढ होत असलेल्या काळात वनखंडे आणि खाडे यांच्यातच लढतीचे संकेत मिळत आहेत. महाविकास आघाडीतून मिरजेच्या जागेवर उबाठा शिवसेनेने हक्क सांगितला आहे. या पक्षाकडून तानाजी सातपुते, सिध्दार्थ जाधव हे उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. काँग्रेसनेही या जागेचा आग्रह धरला असून या पक्षाकडून काही जणांची नावे चर्चेत आहेत. तर खाडे यांच्या विरोधात गेल्या तीन निवडणुका लढविणारे जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब वनमोरे यांनीही उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या सगळ्या राजकीय साठमारीत भाजपअंतर्गत धुमसत असलेला उमेदवारीचा संघर्ष परिवर्तनाला वाव देतो की रूळलेल्या दिशेने जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.