लाडक्या बहिणी'चे पैसे चक्क तरुणाच्या खात्यात जमा; महाजन म्हणतात, पण कौतुक
राज्य सरकारने लाडकी बहीण योजना वाजतगाजत सुरू केली आहे. या योजनेचे गेल्या दोन दिवसांपासून पैसे यायला सुरुवात झाली आहे. आज तर सर्वच महिलांच्या खात्यात दोन हप्ते आले आहेत. रक्षाबंधन असल्यामुळे सरकारने एकदमच दोन हप्ते देण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार ही रक्कम आली आहे. त्यामुळे महिला वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे. सरकारच्या या योजनेचं कौतुकही केलं जात आहे. पण फक्त महिलांसाठीच असलेल्या या योजनेचे पैसे चक्क एका तरुणाच्या खात्यावर जमा झाले आहे. प्रशासनाच्या डुलक्यांमुळे हा प्रकार घडला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शहरातील हाफिज बेग नगरात हा प्रकार घडला आहे. हाफिज बेग नगरमध्ये राहणाऱ्या जाफर गफार शेख या तरुणाच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जमा झाले आहेत. जाफर हा सुशिक्षित बेरोजगार आहे. त्याचं बँक ऑफ बडोदामध्ये खातं आहे. पण त्याच्या खात्यात पैसे आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
चौकशी करा
धक्कादायक बाब म्हणजे जाफरने लाडकी बहीण योजनेसाठी कोणताही अर्ज केला नव्हता. कोणतीही कागदपत्र जमा केली नव्हती. तरीही त्यांच्या खात्यात सरकारने तीन हजार रुपये पाठवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सरकारच्या या भोंगळ कारभारावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या प्रकाराचं स्वत: जाफरलाही आश्चर्य वाटलं आहे. योजनेचे पैसे बँकेत जमा होऊ लागले आहेत. त्यामुळे महिलांना तसा मेसेजही येत आहे. मलाही योजनेचे पैसे जमा झाल्याचा मेसेज आला होता. त्यामुळे मी यवतमाळला जाऊन बँकेत चेक केलं असता माझ्या अकाऊंटमध्ये तीन हजार रुपये आले होते. मी कोणताही अर्ज भरला नव्हता. कोणतीही कागदपत्र जमा केले नव्हते. तरीही माझ्या खात्यात पैसे आल्याने मलाच त्याचं आश्चर्य वाटतंय. या प्रकाराची सरकारने चौकशी केली पाहिजे, असं जाफरचं म्हणणं आहे.
महिलांना अजूनही पैसे नाही
अनेक महिलांनी गर्दीत रेटारेटी करुन लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले. कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून त्यांची धावपळ सुरु होती. मात्र आधार लिंक नसल्याच्या कारणाखाली अजूनही अनेक महिलांचे पैसे जमा झालेले नाही. पण जाफर शेख या तरुणाने साधा अर्जही केलेला नसताना त्याच्या खात्यात तीन हजार जमा झाल्याने शासनाच्या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महाजन काय म्हणाले?
दरम्यान, सरकारच्या या भोंगळ कारभारावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तांत्रिक अडचण असू शकते. त्यामुळे हे झाले असेल. एका तरुणाला पैसे गेले म्हणून तुम्ही बातम्या करता, पण एक कोटी भगिनींना पैसे गेले आहेत याच आपण कौतुक केलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.