Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अन्न सुरक्षा अधिकारी असल्याचे सांगत हॉटेल मालकाला १० हजाराचा गंडा, औदुंबरच्या महिलेस अटक

अन्न सुरक्षा अधिकारी असल्याचे सांगत हॉटेल मालकाला १० हजाराचा गंडा, औदुंबरच्या महिलेस अटक
 

विटा : अन्न सुरक्षा अधिकारी असल्याची बतावणी करीत अन्नात भेसळ होत असल्याचे सांगत विट्यातील एका हॉटेल मालकाला १० हजार रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला.

याप्रकरणी संशयित तोतया अन्न सुरक्षा अधिकारी स्वाती सुनिल पाटील-थोरात (वय ३६, रा. औदुंबर, ता.पलूस) या महिलेला विटा पोलीसांनी अटक केली आहे.

विटा येथील विशाल चंद्रकांत चोथे यांचे कऱ्हाड रस्त्यावर हॉटेल आहे. या हॉटेलात तोतया अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून वावरणारी स्वाती पाटील-थोरात ही वारंवार येत होती. त्यावेळी ती हॉटेल मालकाला अन्न सुरक्षा अधिकारी असल्याचे ओळखपत्र दाखवून तेथे फुकटचे जेवण करीत होती.
त्यानंतर सोमवारी (दि. १२) सकाळी पुन्हा हॉटेलमध्ये आली. त्यावेळी तिने अन्नात भेसळ होत असून तुमच्यावर कारवाई करण्यात येत असल्याची भिती घातली. तसेच कारवाई नको असेल तर १० हजार रूपयांची मागणी केली. विशाल चोथे यांनी त्या महिलेच्या फोन पे वर १० हजार रूपये पाठविले. त्यानंतर स्वाती पाटील-थोरात ही तेथून निघून गेली.

मात्र, हॉटेल मालक विशाल चोथे यांना संबंधित महिलेची शंका आल्याने त्यांनी थेट विटा पोलीस ठाणे गाठून संबंधित स्वाती पाटील-थोरात हिच्याविरूध्द तक्रार दिल्यानंतर बी.एन.एस. कलम ३१८(४), ३१९(२) प्रमाणे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी तोतया महिला अधिकारी स्वाती पाटील-थोरात हिला पोलिसांनी अटक केली असून पोलिस उपनिरिक्षक जयश्री कांबळे पुढील तपास करीत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.