" राणेसाहेब आणि फडणवीसांवर जीभ वळवळली, तर जीभ ठेवायची कां नाही हे ठरवू ", नितेश राणेंचा जरांगे - पाटलांना इशारा
मनोज जरांगे-पाटील याने नारायण राणे यांच्यावर बोलताना दोनवेळा विचार करावा. त्यानं जास्त जीभ वळवळू नये. पुन्हा नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जीभ वळवळली, तर जीभ जागेवर ठेवायची की नाही, हे आम्ही ठरवू, असा एकेरी उल्लेख आमदार नितेश राणे यांनी जरांगे-पाटलांना इशारा दिला आहे.
"मी गणेशोत्सव झाल्यानंतर मराठवाड्यात जाणार आहे. बघू तर जरांगे-पाटील काय करतो," असा इशारा खासदार नारायण राणे यांनी इशारा दिला होता. यानंतर जरांगे-पाटील यांनी नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिलं होते. "अशा फुकट धमक्या नाही द्यायच्या. धमक्यांना मी घाबरत नाही. मी जर म्हणालो मराठवाड्यात येऊ देऊ नका, तर कोकणात सुद्धा तुम्हाला फिरून देणार नाहीत. मी लक्ष घातले, तर खूप फजिती होईल," असं जरांगे-पाटील म्हणाले होते. यावर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत जरांगे-पाटलांवर निशाणा साधला आहे.
"राणेसाहेबांवर बोलताना विचार करा"
नितेश राणे म्हणाले, "जरांगे-पाटील यानं नारायण यांच्यावर बोलताना दोनवेळा विचार करावा. त्याने काय एकट्यानं मराठ्यांचा ठेका घेतला नाही. आम्हीपण 96 कुळी मराठे आहोत. आम्हीही मराठा आरक्षणासाठी केसेस अंगावर घेतल्या आहेत. स्वत: नारायण राणे यांनी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं आहे."
"...तर आम्हालाही उत्तर द्यायला चांगलं जमते"
"जरांगे-पाटील यानं जास्त जीभ वळवळू नये. नारायण राणे यांच्यावर बोलण्याची हिंमत करशील, तर आम्हालाही उत्तर द्यायला चांगलं जमते. तू एकटाच मराठा नाही. तू कुणालाही शिव्या घालतो, कुणावरही टीका करतो. पहिल्यांदा पाठीमागील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि गळ्यातील भगवा गमछा बाजूला कर मग टीका-टिप्पणी कर. पुन्हा नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जीभ वळवळली, तर जीभ जागेवर ठेवायची का नाही, हे आम्ही ठरवू," असं नितेश राणे राणे यांनी ठणकावून सांगितलं.
"जरांगे-पाटील याने तुतारी वाजवत राज्यात फिरावे"
"जरांगे-पाटील भाजपच्या नेत्यांना जाब विचारतो. कधी शरद पवारसाहेब, उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंना मराठा आरक्षणाबाबत जाब विचारला नाही. यापेक्षा जरांगे-पाटील याने तुतारी वाजवत राज्यात फिरावे. कारण, तू तुतारीचा माणूस आहे, हे जगाला कळलं आहे. रात्री तुतारी वाजवायची आणि सकाळी उठून भाजपवर टीका करायची, हा तमाशा महाराष्ट्रात जास्तवेळ चालणार नाही," अशी हल्लाबोल नितेश राणे यांनी जरांगे-पाटलांवर केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.