डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना संरक्षण द्या.. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची मागणी डॉक्टरांच्या आंदोलनाला पाठिंबा..
सांगली, दि.१७ : राज्यातील सरकारी तसेच निमसरकारी इस्पितळातील डॉक्टर्स आणि त्यांच्या सहकारी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना शासनाने तातडीने संपूर्ण संरक्षण द्यावे, अशी मागणी आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात आमदार गाडगीळ यांनी डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्यावर होणारे हल्ले अथवा त्याला दाखवली जाणारी दहशत अशा प्रकारांबाबत तातडीने पोलीस कारवाई व्हावी अशी ही मागणी केली आहे.
कोलकत्ता येथील शासकीय इस्पितळातील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटने संदर्भात आमदार गाडगीळ यांनी महाराष्ट्रातील सर्व खाजगी सर्व सरकारी निमसरकारी तसेच खाजगी इस्पितळातील डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाची तसेच त्यांना दिलासा देण्याची मागणी केली आहे. कोलकत्ता येथे घडलेले घडलेल्या प्रकारासारखा प्रकार राज्यात कुठेही घेऊ नये म्हणून शासनाने दक्षता घ्यावी अशी ही विनंती त्यांनी नामदार फडणवीस यांना केली आहे. कोलकत्ता येथील घटनेचा आमदार गाडगीळ यांनी तीव्र शब्दात निषेध केला असून डॉक्टरांच्या देशव्यापी आंदोलनास पूर्ण पाठिंबा दिला आहे.
ना.फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात आमदार गाडगीळ यांनी म्हटले आहे की, डॉक्टर्स आणि त्यांचे सहकारी वैद्यकीय कर्मचारी हे रुग्णसेवेमध्ये आपले जीवन व्यतीत करतात. स्वतःच्या आरोग्याचा आणि स्वतःच्या वैयक्तिक जीवनाचा विचार न करता डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी (नर्सेस आणि इतर स्टाफ) हे रुग्णांच्या सेवेमध्ये सतत कार्यरत असतात. याचा प्रत्यय आपल्याला कोरोनासारख्या साथीच्या काळातही आणि अन्यवेळीही आला आहे. परंतु हे डॉक्टर्स आणि त्यांचे सहकारी कर्मचारी यांचे जीवनच अनेकदा धोक्यात येत असल्याचे दिसून येते.
कोलकत्ता येथील गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर, घृणास्पद आणि निषेधार्थ अशी आहे. त्या संदर्भात आता माननीय हायकोर्टाच्या निर्णयानुसार सीबीआय चौकशी करत आहे ही त्यातल्या त्यात दिलासा देणारी गोष्ट आहे. परंतु त्या घृणास्पद आणि निषेधार्य घटनेतील सर्व दोषींवर तातडीने अत्यंत कठोर कारवाई केली जावी अशी केवळ डॉक्टर्स त्यांचे सहकारीच नव्हे; तर तमाम नागरिकांचीही तीव्र अपेक्षा आहे. निवेदनात म्हटले आहे की, रुग्णांच्या सेवेसाठी आपला जीव धोक्यात घालून काम करणारे डॉक्टर्स आणि त्यांचे वैद्यकीय कर्मचारी यांच्यासाठी तातडीने काही उपाययोजना करण्याची गरज आहे. त्या पुढील प्रमाणे असाव्यात असे वाटते:
१) प्रत्येक सरकारी आणि निमसरकारी रुग्णालयात डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी यांच्या संरक्षणासाठी व्यवस्था करावी.त्यासाठी पोलीस, महिला पोलीस यांचीही नेमणूक करावी.
२) प्रत्येक सरकारी, निमसरकारी आणि खाजगी अशा प्रत्येक इस्पितळामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सोय असलीच पाहिजे असा नियम कटाक्षाने करावा.त्यामुळे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचे किंवा त्यांना धमकवल्याचे तसेच हॉस्पिटलवरील हल्ल्याचे प्रसंग समोर आल्यास गुन्हेगारांवर कारवाई करणे सोपे जाईल. अनेकदा सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असतात ;परंतु ते काम करीत नाहीत (म्हणजेच बंद असतात ).त्यामुळे अशा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या चलनवलनाचाही सातत्याने आढावा घेतला जावा. त्यासाठी विशेष अधिकाऱ्याची नेमणूकही त्या त्या हॉस्पिटलमध्ये केली जावी अथवा एखाद्या वरिष्ठ डॉक्टरांच्याकडे याची जबाबदारी द्यावी.
३) डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्यावर हल्ला करणे,त्यांना धमकावणे किंवा त्यांच्यावर दबाव आणणे अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांबाबत पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला पाहिजे. संबंधितांवर तातडीने अटकेसह सर्व ती कठोर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. त्यामध्ये कोणताही विलंब होऊ नये.त्यामुळे डॉक्टरांना निर्भयपणे त्यांचे काम करता येईल. कोलकत्ता येथील घटनेमुळे संपूर्ण देशातील विविध इस्पितळात काम करणारे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्यामध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. ते तातडीने दूर करण्याची गरज आहे.३) सर्व रुग्णालयांमध्ये डॉक्टर्स आणि त्यांचे वैद्यकीय सहकारी यांच्यासाठी सर्व आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. वैद्यकीय उपकरणे तसेच सोयीसुविधांच्याअभावी त्यांची गैरसोय होऊ नये तसेच वैद्यकीय सेवेत अडथळे येऊ नयेत याकडे शासनाने लक्ष पुरवावे.४) एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर कारवाई करण्याऐवजी सातत्याने दरमहा अशा इस्पितळातील सुरक्षा व्यवस्था तसेच डॉक्टरांची संरक्षण व्यवस्था यांचा सातत्याने आढावा घेतला जावा. त्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयात तसेच तालुका व महापालिका आणि नगर परिषदा स्तरावर विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी.५) अनेकदा शासकीय व निमशासकीय रुग्णालयांमध्ये औषधे,वैद्यकीय उपकरणे यांचा तुटवडा असतो. त्यामुळे रुग्णांमध्ये असंतोष निर्माण होतो आणि त्याचा अकारण फटका डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी यांना बसतो. रुग्णांचा राग डॉक्टरांच्यावर व कर्मचाऱ्यांवरच निघतो.त्यामुळे अशा इस्पितळांमधील औषधे, उपकरणे यांचा सातत्याने आढावा घेतला जावा आणि कमतरतेची पूर्तता करावी.
६) कोलकत्ता येथील दुर्दैवी आणि अत्यंत निषेधार्य घटनेच्या निमित्ताने डॉक्टरांनी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी जे देशव्यापी आंदोलन सुरू केले आहे त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. सर्व नागरिकही डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत आणि यापुढेही उभे राहणार आहेत. निवेदनात म्हटले आहे की आपण संवेदनशील आणि कार्यतत्पर गृहमंत्री असल्याने वरील सर्व मुद्द्यांचा विचार करून तातडीने कार्यवाही कराल याची मला खात्री आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही कोलकत्ता येथील दुर्घटनेची गांभीर्याने दखल घेऊन डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्यावरील कोणत्याही स्वरूपाच्या हल्ला अथवा धमकी याबद्दल तातडीने एफ आय आर दाखल करावा असे आदेश दिले आहेत. त्याबद्दल केंद्रीय वैद्यकीय मंत्रालयाचे मी आभार मानतो. कृपया माझ्या विनंतीचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून तशा कार्यवाहीचे आदेश तातडीने द्यावेत हीच नम्र विनंती!
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.