फडणवीसांना पाठवलेल्या पत्रात जयंत पाटलांचे नाव; वसुली प्रकरणात सचिन वाझेचा मोठा गौप्यस्फोट
अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेनं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी आपल्यावर दबाव टाकला होता. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार यांच्यावर आरोप करणारी शपथपत्र देण्यासाठी फडणवीसांनी दबाव टाकला होता असा आरोप सातत्याने अनिल देशमुख करत होते. त्यानंतर आता बडतर्फ अधिकारी सचिन वाझेने धक्कादायक आरोप केले आहेत. वाझेने आता शरद पवार यांच्या जवळच्या व्यक्तीचेही नाव खंडणी प्रकरणात घेतल्याने खळबळ उडाली आहे.
कथित १०० कोटी वसुली प्रकरणात सचिन वाझेने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. रुग्णालयात नेत असताना सचिन वाझेने एनआयला दिलेल्या प्रतिक्रियेत गंभीर आरोप केले. मनसूख हिरेन हत्याकांड आणि अँटिलिया बॉम्ब प्रकरणात सचिन वाझे सध्या तुरुंगात आहे. त्यानंतर आता सचिन वाझेने अनिल देशमुखांवर धक्कादायक आरोप केले. अनिल देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआयकडे पुरावे आहेत. देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आरोप वाझेने केला. अशातच अनिल देशमुखांवर आरोप करताना सचिन वाझेने शरद पवार गटाचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांचाही उल्लेख केला आहे. अनिल देशमुखांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीसांना लिहिलेला पत्रात जयंत पाटील यांच्या नावाचाही उल्लेख केल्याचा दावा सचिन वाझेने केला.
"जे काही आहे, त्याचे पुरावे आहेत. सगळे पुरावे आहेत. पैसे त्यांच्या (अनिल देशमुख) पीएच्या माध्यमातून दिले जात होते. आणि सीबीआयकडेही पुरावे आहेत. मी अलिकडेच देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. सगळे काही त्यांच्या विरोधात गेलेले आहे. सगळे पुरावे त्यांना दिले आहेत. मी सर्व पुरावे पाठवले आहेत", असे वाझे म्हणाला. त्यानंतर यात आणखी कुणाचे नाव आहे का?, असा सवाल वाझेला विचारण्यात आला. त्यावर वाझेने, पत्र लिहिले आहे, त्यात जयंत पाटील यांचे नाव लिहिलेले आहे, असं म्हटलं.वाझेने जयंत पाटील यांचेही नाव घेतल्याने आता खळबळ उडाली आहे. वाझे याने जयंत पाटील यांचे नाव का घेतलं हे आता देवेंद्र फडणवीसांना पाठवलेल्या पत्रातून समोर येणार आहे. मात्र आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.