महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? काँग्रेसच्या बैठकीनंतर मोठी अपडेट्स
महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका आता अवघ्या काही महिन्यांच्या अंतरावर येऊन ठेपल्या आहेत, त्याआधी काँग्रेसची महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडली. महाविकासआघाडीची 7 तारखेला बैठक होणार आहे, या बैठकीआधी काँग्रेसनेही बैठकीचं आयोजन केलं होतं. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला या बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर चेन्नीथला यांनी महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबतही प्रतिक्रिया दिली आहे.
7 तारखेला महाविकासआघाडीची बैठक आहे. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, उद्धव ठाकरे, शरद पवार येणार आहेत. आम्ही महाविकासआघाडी म्हणून एकत्र काम करणार आहोत. आम्ही एकत्र निवडणूक लढणार आहोत. असं रमेश चेन्नीथला म्हणाले आहेत. तसंच 7 तारखेला जागा वाटपाचा मुद्दा मांडू. जागा किती यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. महाविकासआघाडी मोठ्या प्रमाणावर पुढे जात आहे, जनता आमच्यासोबत आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाही, असंही चेन्नीथला यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत मुंबईतल्या जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. लोकसभेमध्ये आम्ही ज्या पद्धतीने एकत्र लढलो आणि विजय मिळवला त्याच पद्धतीने विधानसभेतही आम्ही एकत्र लढून विजय मिळवू, असा विश्वास वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला. तसंच मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 16 जागा लढण्याची मागणी केल्याचं वृत्त समोर आलं होतं, पण याबाबत आपल्याला काही माहित नसल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. काँग्रेसच्या या बैठकीला महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान, नितीन राऊत हे नेते उपस्थित होते.
वरुण सरदेसाई काँग्रेसच्या बैठकीला
दरम्यान ठाकरे गटाचे युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई काँग्रेसची बैठक ज्या हॉटेलमध्ये होती तिकडे गेले होते. वरुण सरदेसाई वांद्रे पूर्वमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, पण ही जागा काँग्रेसकडे आहे. काँग्रेसचे नाराज आमदार झिशान सिद्दीकी या मतदारसंघाचे आमदार आहेत. वरुण सरदेसाई ही जागा शिवसेना ठाकरे पक्षाला सोडावी, अशी विनंती करण्यासाठी काँग्रेस नेत्यांची भेट घ्यायला गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान वरुण सरदेसाई यांनी विधान परिषदेत झालेल्या क्रॉस व्होटिंगवरून भेट घेतल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं आहे. 'वरुण सरदेसाई विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झालं त्याबाबतचा अहवाल देण्यासाठी आले होते. आम्ही त्यांना 7 मतं देऊ असं ठरलं होतं, पण दोन मतं फुटली, त्याचा पडताळणी अहवाल दिला. आम्ही कारवाई केली आहे, चार्जशीट तयार झाली आहे. कारवाई झालेली तुम्हाला नक्की दिसेल. तीच दोन माणसं आहेत हे अहवालात दिसून आलंय', असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.