मुस्लीम तरुणांकडून रात्रभर मंदिरांचे रक्षण; म्हणाले, हिंदूंसोबत नवा बांगलादेश बनवू
नवी दिल्ली : बांगलादेशमध्ये शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बांगलादेशमधील लष्कराच्या मदतीने मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाले. तरीही बांगलादेशमधील हिंसाचार कमी झालेला नाही.
अद्यापही अनेकठिकाणी हिंदुंवर अत्याचार होत आहेत. अजूनही हिंदूंवर हल्ले आणि त्यांची घरे लुटण्याच्या घटना अजूनही सुरू आहेत. दंगलखोरांकडून हिंदूंची घरे लुटली जात असून मंदिरांचीही तोडफोड सुरु आहे. असे भीषण वास्तव असतानादेखील हिंदु आणि मुस्लीम बांधवांमध्ये बंधुभाव पाहायला मिळत आहे.
एकीकडे हिंदूंविरोधात कटकारस्थाने रचले जात असताना काही मुस्लीम तरुण हे हिंदूंसोबत मंदिरांचे रक्षण करत असून रात्रभर मंदिराबाहेर पहारा देत आहेत. तसेच, यावेळी अनेक मुस्लीम बांधवांनी, 'हिंदू आणि मुस्लिमांमधील बंधुभाव कधीही संपुष्टात येऊ दिला जाणार नाही. एकत्र येऊन नवा बांगलादेश निर्माण करायचा आहे.' अशी इच्छादेखील त्यांनी व्यक्त केली आहे. काही दंगलखोरांकडून हिंदूंना लक्ष्य करण्यात आले. त्यांच्या निषेधार्थ ढाका युनिव्हर्सिटीजवळ हिंदू-मुस्लिम बांधवासाठी एक विशाल रॅली काढण्यात आली. यावेळी या रॅलीमध्ये हजारहून अधिक तरुण सहभागी झाले होते. तसेच फक्त स्थानिक मुस्लिमच नाही तर हिंदूही यामध्ये सहभागी झाले होते.
या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या मुस्लीम तरुणांनी सांगितले की, ते हिंदूंची घरे आणि मंदिरे लुटण्याचे अजिबात समर्थन करत नाहीत. अशा घृणास्पद हल्ल्यांमध्ये सहभागी असलेले लोक त्यांच्या समुदायाचे नव्हते. बांगलादेशामध्ये हसीना सरकार पडून आणि नवीन अंतरिम सरकार स्थापन होऊनही हिंसाचार थांबत नाही. अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी हिंदूंवरील हिंसाचाराच्या घटनांवर नाराजी व्यक्त केली आहेत.
या घटना थांबण्यात यावे, असे आवाहन केले आहे. दरम्यान, अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचाराचे 200 हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. बांगलादेशच्या 170 दशलक्ष लोकसंख्येपैकी 8 टक्के हिंदू आहेत. गेल्या आठवड्यामध्ये धार्मिक अधिकार गटांने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी ख्रिश्चन आणि बौद्धांसह अल्पसंख्याक समुदायांवरील हल्ल्यांच्या 200 हून अधिक घटनांचे दस्तऐवजीकरण केले आहे. या घटनांमध्ये घरांवर हल्ले, दुकाने आणि प्रार्थनास्थळांची तोडफोड यांचा समावेश आहे. महिलांवरही अत्याचार झाले करण्यात आले आहेत" असे मानवाधिकार कार्यकर्ते राणा दासगुप्ता यांनी सांगितले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.