सांगलीत दोन सराईत गुन्हेगाराना अटक चार गुन्हे उघड, ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त, विश्रामबाग पोलिसांची कारवाई
सांगली : सांगली शहरात विविध ठिकाणाहून दुचाकी चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणत दोन दुचाकी, दोन सळी कटिंग मशिन, एक हॅंडग्राईंडर असा ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली.
सुमित विनोद शिंदे (वय १९, रा. विद्याविहार कॉलनी, सांगली), वृषभ सतीश हराळे (वय २२, रा. स्फूर्ती चौक, विश्रामबाग, सांगली, मूळ रा. येळावी, ता. तासगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शहरात विविध ठिकाणी दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत. यातील चोरट्यांचा विश्रामबागचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक शोध घेत होते. त्यावेळी वानलेसवाडी येथे विना क्रमांकाच्या दुचाकीवरून तिघेजण जात असल्याचे पथकातील संकेत कानडे, प्रशांत माळी यांना दिसले.
त्यावेळी त्यांनी दुचाकीवरील तिघांना थांबवून त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांच्याकडील दुचाकीच्या कागपत्रांबाबत चौकशी केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी विजयनगर येथील दोन अपार्टमेंट परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच आपटा पोलिस चौकी परिसरात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणाहून सळी कटिंग मशिन, हॅंडग्राईंडर चोरल्याचीही कबुली दिली. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्याकडून विश्रामबाग पोलिस ठाण्याकडील तीन, संजयनगर पोलिस ठाण्याकडील एक असे चार गुन्हे उघडकीस आणण्यात आले.विश्रामबागचे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक स्वप्नील पोवार, प्रवीण कांचन, बिरोबा नरळे, संदीप साळुंखे, संकेत कानडे, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर, रेखा देशमुख, सचिन घोदे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.