पोलिसांनो, मस्ती कराल तर... नितेश राणे म्हणाले, त्या वक्तव्यावर मी ठामच, पण सगळे पोलीस अधिकारी तसे नसतात
नागपूर: राज्यातील कथित लव्ह जिहादबाबत भाष्य करताना भाजप आमदार नितेश राणे यांनी पोलिसांबाबत एक आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन प्रचंड गदारोळ झाला होता. या सगळ्या घडामोडींबाबत भाष्य करताना नितेश राणे यांनी मी माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हटले.
मी सर्वच पोलीस अधिकाऱ्यांबद्दल बोललो नाही. मात्र, काही पोलीस अधिकारी लव जिहाद व लँड जिहादवाल्यांना मदत करतात. त्यांना आम्ही सोडणार नसल्याचे म्हणत पोलिस अधिकाऱ्यांसंदर्भातल्या वक्तव्यावर आपण कायम असल्याचे एबीपी माझाशी बोलताना नितेश राणे यांनी सांगितले. पीडित मुलींच्या आईवडिलांचे ऐकून घेणार नसेल, न्याय मिळवून देण्यापेक्षा पीडितांची चौकशी करणार असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका घेणे माझे कर्तव्य असल्याचे नितेश राणे म्हणाले. विरोधकांच्या इशाऱ्यावर जे अधिकारी काम करणार असेल तर अशा अधिकाऱ्यांनी आपली वर्दी वाचवून दाखवावी, असा इशारा नितेश राणे यांनी दिला. ज्या अधिकाऱ्यांमुळे गृह खाते बदनाम होत आहे, त्यांची तक्रार गृहमंत्र्यांकडे करुन कारवाईची मागणी करणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.
नितेश राणे या लहान मुलाबाबत बोलणार नाही. देवेंद्र फडणवीस यांना बुडवण्यासाठी नितेश राणे, चित्रा वाघ यांच्यासारखे शाउटिंग ब्रिगेट कारणीभूत असतील. गृहमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे, असा टोला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला.
नितेश राणे यांनी मंगळवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या शिवशक्ती-भिमशक्ती जनआक्रोश मोर्चाच्या व्यासपीठावरुन एक स्फोटक वक्तव्य केले होते. सरकार हिंदूंचे आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू की जिथून तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. मी काही निवेदन वगैरे देत बसत नाही, ती भाषा मला जमत पण नाही. मी डायरेक्ट कार्यक्रम करतो. पोलिस ठाण्यात लव्ह जिहाद बाबत तक्रार देण्यात येणाऱ्या मुलीची तक्रार अर्ध्या तासात घेतली पाहिजे, अन्यथा पुढच्या तीन तासात पोलिस ठाण्यात दाखल होऊन धिंगाणा घालू, असेही नितेश राणे यांनी म्हटले होते.
निलेश राणे यांच्या या वक्तव्याबाबत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी नापसंती व्यक्त केली आहे. ठीक आहे ह्या सर्व प्रशासकीय बाबी आहेत. परंतु गृहमंत्री पदी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. नितेश राणे काही बोलले असतील. परंतु ते चुकीचे आहे. पोलिसांच्या काम पोलीस करतील.आपण राजकारणी आहोत त्यादृष्टीने आपण काम केले पाहिजे, असे धर्मरावबाबा आत्राम यांनी म्हटले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.