Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यातील अधिकाऱ्यांच्या २० ऑगस्टपर्यंत बदल्या करा राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य सचिवांना पत्र

राज्यातील अधिकाऱ्यांच्या २० ऑगस्टपर्यंत बदल्या करा राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य सचिवांना पत्र
 

मुंबई : महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, जम्मू आणि काश्मिर या राज्याच्या विधानसभा निवडणुका लवकरच घेण्यात येणार आहेत. आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी निवडणूक होऊ घातलेल्या राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या दि. २० ऑगस्टपर्यंत करण्यात याव्यात अशा सूचना राष्ट्रीय निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. आयोगाचे सचिव अश्विनी कुमार यांच्या सहीने बुधवारी हे आदेश देण्यात आले आहेत. 
 
चारही राज्याच्या मुख्य सचिवांना पत्राद्वारे बदल्यांबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. यामध्ये ज्या अधिकाऱ्यांचा थेट निवडणुक प्रक्रियेशी संबंध येतो त्यांच्या बदल्या नियमानुसार करण्यात याव्यात असेही या आदेशात म्हटले आहे. स्वतःचा जिल्हा तसेच एकाच जिल्ह्यात तीन वर्षे सेवा झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात याव्यात अशाही सूचना या पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत.  

पोलिस विभागातील तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागातील उपनिरीक्षक दर्जासह त्यावरील अधिकाऱ्यांच्या निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे बदल्या करण्यात याव्यात असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील दोन आठवड्यात महसूल, पोलिस, राज्य उत्पादन शुल्क तसेच अन्य शासकीय विभागातील अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या होणार आहेत.  

उत्पादन शुल्कच्या सार्वत्रिक बदल्या रखडल्या
 
राज्य उत्पादन शुल्क विभागाची पुनर्रचना केल्यानंतर या विभागातील सार्वत्रिक बदल्या अद्यापही करण्यात आलेल्या नाहीत. या बदल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून रखडल्या आहेत. आता विधानसभा निवडणुकीच्या आधी या विभागातील सार्वत्रिक बदल्या कराव्या लागणार आहेत. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्कच्या बदल्यांकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.