हिजाब न घालता चालवली कार, पोलिसांनीच तरुणीवर झाडल्या गोळ्या, संपूर्ण जग सुन्न
घटना आहे 16 सप्टेंबर 2022 ची...मेहसा अमिनी या तरुणीच्या मृत्यूनंतर इराणमध्ये मोठी आंदोलनं झाली. हिजाब नीट घातला नाही म्हणून मेहसाला ताब्यात घेण्यात आलं होतं, नंतर कोठडीत तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर इराणमध्ये आंदोलनं वाढत गेली. आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांची पथकं रस्त्यावर गस्त घालत होती. यावेळी झालेल्या हिंसाचारात, मेहसाप्रमाणेच आणखी आंदोलकांचाही जीव गेला.
याची आठवण आत्ता होण्याचं कारण म्हणजे, इराणमध्ये हिजाबवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. एका मुस्लिम महिलेला हिजाब न घालता गाडी चालवल्यामुळे इराण पोलिसांनी गोळ्या घातल्या. पोलिसांनी थांबवून अडवल्यानंतरही तिनं सूचनांचं पालन केलं नाही असा तिच्यावर आरोप आहे. आरेजू बद्री असं या पीडितेचं नाव असून ती 2 मुलांची आई आहे. पण पुढचं सत्य आणखी भीषण आहे, कारण आरेजूला पुढचं आयुष्य अंथरुणावर आणि इतरांच्या आधारावर अवलंबून काढावं लागणार आहे. कारण गोळी लागल्यानं तिचा कमरेपासून खालचा भाग अधू झाला आहे.
राजधानी तेहरानपासून सुमारे 121 मैलांवर असलेल्या नूर शहरात 22 जुलैला ही घटना घडली. 31 वर्षीय अरेझू बद्री घरी जाताना त्यांना पोलिसांनी अडवलं. त्यांनी डोक्यावर नीट हिजाब घातलेला नव्हता. अडवल्यानंतरही हिजाब घेतला नाही, तेव्हा त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. प्रथम कारवर गोळी झाडण्यात आली, जी टायरवर आदळली. दुसरी गोळी आरेजू यांच्यावर झाडण्यात आली. ती त्यांच्या पाठीच्या कण्याला लागली. त्यांच्या फुफ्फुसात एक गोळी आढळून आली. दोन्ही गोळ्या काढण्यात आल्या, पण गोळीमुळे त्यांच्या पाठीच्या कण्याला इजा झाली आणि त्यांना अर्धांगवायू झाला.
पोलिसांनीच अरेजूच्या कुटुंबीयांना त्याच्याबद्दल माहिती दिल्याचं मिररच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं. कुटुंबीयांनी घटनास्थळी येऊन त्यांना नूर शहरातील रुग्णालयात नेलं, अवस्था पाहून त्यांना ७२ मैल दूर असलेल्या मोठ्या रुग्णालयात पाठवण्यात आलं. ऑपरेशन झालं, पण डॉक्टर गोळी काढू शकले नाहीत. घटनेच्या एका आठवड्यानंतर, त्यांना तेहरानला नेण्यात आलं, तिथे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून आरेजू यांच्या पाठीच्या कण्यामध्ये अडकलेली गोळी काढली.नूरचे पोलीस प्रमुख कर्नल अहमद अमिनी यांनी आरेजू बद्रीचे नाव घेतले नाही, परंतु चालकानं पोलिसांच्या आदेशाचे पालन केलं नाही म्हणून अधिका-यांनी गोळ्या झाडल्या अशी माहिती दिली. 'इराणच्या कायद्यानुसार गोळीबार न्याय्य आहे. आरेजू बद्री यांनी कायद्यानुसार डोक्यावर स्कार्फ घातला होता किंवा डोक्यावर काहीही घातलं नव्हतं हे स्पष्ट झाले नाही, परंतु त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि गाडीवर जप्तीची नोटीस लावण्यात आली' अशी माहिती त्यांनी इराणच्या स्थानिक वृत्तसंस्थेला दिली.
आरेजू यांनी कायद्याचं उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई पूर्णपणे योग्य आहे असं त्यांना दिलेल्या नोटीसमध्ये म्हणण्यात आलं आहे. बद्री यांच्या कुटुंबाच्या तक्रारीवर या आठवड्यात सुनावणी होण्याची अपेक्षा होती. बद्री कुटुंबीयांना, गुप्तचर आणि सुरक्षा एजन्सींनी बोलावलं आहे, आणि शांत राहण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात आहे आणि त्यांची तक्रार मागे घेण्यास सांगितलं जात आहे अशी माहिती इराण इंटरनॅशनलनं दिली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.