Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'मला या वातावरणात जगायचे नाही...', राज्यसभेत भावूक झाले मल्लिकार्जुन खरगे; कारण काय?

'मला या वातावरणात जगायचे नाही...', राज्यसभेत भावूक झाले मल्लिकार्जुन खरगे; कारण काय?
 
 
नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बुधवारी(दि.31) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे अतिशय भावूक झाले. मंगळवारी (30 जुलै) भाजप नेते घनश्याम तिवारी  यांनी खरगे यांच्या नावावर केलेल्या टिप्पणीमुळे खरगे दुखावले गेले.

यावेळी त्यांनी, घनश्याम तिवारी काही टिप्पण्या सभागृहातून काढून टाकण्याची विनंतीही केली. यावर राज्यसभा सभापती जगदीप धनखड म्हणाले की, ते घनश्याम तिवारी यांनी मंगळवारी सभागृहात केलेल्या टिप्पण्यांवर लक्ष देतील आणि मन दुखावले जाईल, अशी कोणतीही गोष्ट रेकॉर्डवर राहणार नाही.

मल्लिकार्जुन खरगे भावूक...

भाजपचे खासदार घनश्यान तिवारी यांनी मंगळवारी राज्यसभेत बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावावर बोचरी टीका केली आणि त्यांच्यावर घराणेशाहीचाही आरोप केला. दरम्यान, आज राज्यसभेचे कामकाज सुरू होताच मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, माझ्या पालकांनी अतिशय विचारपूर्वक माझे नाव ठेवले आहे. आपल्या मुलाचे नाव 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असावे, अशी त्यांची इच्छा होती. घनश्याम तिवारी यांना माज्या नावाची काय अडचण आहे? असा सवाल त्यांनी केला.

मला या वातावरणात जगायचे नाही

ते पुढे म्हणाले, घनश्याम तिवारी यांनी माझ्यावर घराणेशाहीचाही आरोप केला. पण, मी सांगू इच्छितो की, राजकारणात प्रवेश करणारा मी माझ्या कुटुंबातील पहिला व्यक्ती आहे. माझे वडील आणि आई राजकारणात नव्हते. आई गेल्यानंतर वडिलांनी मला वाढवले आणि त्यांच्याच आशीर्वादाने मी इथपर्यंत पोहोचलो आहे. अध्यक्ष महोदय मला या वातावरणात जगायचे नाही, अशी प्रतिक्रिया खरगेंनी दिली. त्यावर धनखड म्हणाले की, तुम्ही दीर्घायुषी व्हाल, आणखी खुप पुढे जाल.

काय म्हणाले होते घनश्याम तिवारी?

भाजप खासदार घनश्यान तिवारी यांनी राज्यसभेत बोलताना विरोधकांवर घराणेशाहीचा आरोप करत मल्लिकार्जुन खरगे यांचेही नाव घेतले होते. ते म्हणाले की, 'त्यांचे नाव मल्लिकार्जुन आहे. मल्लिकार्जुन भगवान शंकराचे एक नाव आहे. ज्याप्रमाणे भगवान शंकराची प्राणप्रतिष्ठा करताना संपूर्ण कुटुंबाची प्राणप्रतिष्ठा केली जाते, त्याप्रमाणे ह्यांनी राजकारणात आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्राणप्रतिष्ठा केली.' यावर विरोधी खासदारांनी जोरदार गदारोळ केला आणि ही टिप्पणी रेकॉर्डमधून काढण्याची मागणी केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.