पशुधन पर्यवेक्षक 5000 लाच घेतांना लाच लुचपतच्या जाळ्यात
दुधाळ गाई/म्हशीचे वाटप करण्याच्या शासकीय योजनेतील लोणी मटकाविण्याचा प्रयत्न एका पशुधन पर्यवेक्षकाच्या चांगलाच अंगाशी आला. योजनेच्या अंतिम यादीमध्ये लाभार्थी म्हणून नाव टाकण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पशुधन पर्यवेक्षकाला रंगेहाथ पकडले. बंडु बबन देवकर (वय ४३, कुडे बुद्रुक, ता. खेड) असे या पशुधन पर्यवेक्षकाचे नाव आहे.
तक्रारदार यांनी महाराष्ट्र राज्य स्तरीय योजना दुधाळ गाई/ म्हशीचे वाटप करणे या योजनेचा लाभ मिळणेकरीता ऑनलाईन अर्ज सादर केला होता. पशुधन पर्यवेक्षक बंडू देवकर याने तक्रारदार यांना या योजनेच्या अंतिम यादीमध्ये लाभार्थी म्हणून नाव घालून देतो, त्या करीता तक्रारदार यांच्याकडे ७ हजार रुपयांची लाच मागितली.तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीची पडताळणी ३१ जुलै, १ व ५ ऑगस्ट रोजी करण्यात आली. त्यामध्ये बंडू देवकर याने तडजोडी अंती ५ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कुडे बुद्रुक येथील पशु वैद्यकीय रुग्णालयात मंगळवारी सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून ५ हजार रुपये स्वीकारताना बंडू देवकर याला पकडले पोलीस अधीक्षक अमोल तांबे , अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक रुपेश जाधव तपास करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.