फक्त 50 ग्रॅमची किंमत 850 कोटीं, ' कॅलीफोर्नीयम ' धातू आहे तरी काय? बिहार पोलीसांनी 3 तस्करांना केली अटक
पाटना : बिहारमधल्या गोपालगंज भागात पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आलीय. तिथे पोलिसांनी 50 ग्रॅम कॅलिफोर्नियम या मौल्यवान किरणोत्सारी पदार्थासह 3 तस्करांना अटक केलीय. जप्त करण्यात आलेल्या कॅलिफोर्नियमच्या 50 ग्रॅमची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत तब्बल 850 कोटी रुपये आहे.
कॅलिफोर्नियम म्हणजे काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. कॅलिफोर्नियमचा उपयोग अणुभट्ट्यांपासून अणुऊर्जा निर्मितीसाठी, तसंच मेंदूच्या कॅन्सरसारख्या अनेक गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो. प्रामुख्यानं याचा वापर अणुभट्ट्या सुरू करण्यासाठी, कोळसा ऊर्जा प्रकल्प ऑप्टिमाइझ करण्यासाठी, कॅन्सरवर उपचार करण्यासाठी आणि जमिनीतून तेल काढण्यासाठी केला जातो. कॅलिफोर्नियम प्रयोगशाळेत तयार केलं जातं व ते तयार करण्याचं प्रमाणही कमी आहे. यामुळेच त्याची किंमत खूप जास्त आहे.
कॅलिफोर्नियम म्हणजे काय?
कॅलिफोर्नियम हा सिंथेटिक किरणोत्सारी पदार्थ आहे. तो बर्कले कॅलिफोर्निया विद्यापीठातल्या एका टीमने 1950मध्ये प्रथम तयार केला होता. या पदार्थाचं नाव अमेरिकेतलं कॅलिफोर्निया राज्य आणि तो शोधणाऱ्या विद्यापीठाच्या नावावरून देण्यात आलंय. कॅलिफोर्नियम पदार्थ पीरिऑडिक टेबल अॅक्टिनाइड सीरिजमध्ये येतो. हा नैसर्गिक पदार्थ नाही. तो अणुविक्रियांद्वारे तयार होतो. तो चांदीसारखा चमकदार दिसतो. तो सुमारे 900 अंश सेल्सिअस तापमानात वितळतो. शुद्ध असणारा कॅलिफोर्नियम धातू इतका मऊ असतो, की तो अगदी सहजपणे कापला जातो. रूम टेम्परेचरला तो खूप कडक होतो.
आरोग्यासाठी आहे धोकादायक
कॅलिफोर्नियममधला घटक अत्यंत किरणोत्सर्गी असल्यानं तो आरोग्यासाठी खूप धोकादायक मानला जातो. त्यामुळे त्याचा कोणताही जैविक उपयोग अद्याप झालेला नाही. कॅलिफोर्नियम जेवढा चमकदार असतो, तेवढाच तो जास्त धोकादायक असतो. हा धातू प्रत्येक सजीवाच्या आनुवंशिकतेला नुकसानकारक ठरतो.
कुठे होतो वापर?
कॅलिफोर्नियम हा न्यूट्रॉनचा खूप चांगला स्रोत आहे. त्यामुळे तो अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये न्यूट्रॉन स्टार्टअप स्रोत म्हणून वापरला जातो. याशिवाय मेंदू आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरवर उपचार करताना याचा उपयोग होतो. कॅलिफोर्नियम हा धातू सामान्यपणे दोन स्वरूपात अस्तित्वात असतो. उच्च दाबावर याचं तिसरं स्वरूपही असतं. हवेच्या संपर्कात आल्यावर तो हळूहळू नाहीसा होऊ लागतो. तो पाण्यातही स्थिर राहतो. हा नैसर्गिकरीत्या आढळत नसून, तो प्रयोगशाळेत तयार केला जातो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.