बंगळुरुमधील व्हाइटफिल्ड परिसरात एक धक्कादायक घटनाक्रम उघडकीस आला आहे. एका 32 वर्षीय महिलेला तिच्या प्रियकराबरोबर पतीने नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर पत्नी आणि तिच्या प्रियकराने पतीची हत्या केली.या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
कोणाबरोबर घडला हा प्रकार?
समोर आलेल्या माहितीनुसार, मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव महेश असं असून तो 36 वर्षांचा होता. महेश हा रिक्षाचालक होता. हगादूर येथे राहाणाऱ्या महेशची त्याची पत्नी तेजस्विनी आणि तिचा 34 वर्षीय प्रियकर गजेंद्र बाबू या दोघांनी हत्या केली. गजेंद्र बाबू हा इंदिरानगरचा रहिवाशी असून त्याचे मागील बऱ्याच काळापासून तेजस्विनीबरोबर विवाहबाह्य संबंध होते.
पोलिसांना थेट सायंकाळी समजलं
व्हाइटफिल्ड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस्विनी आणि गजेंद्रने युएसबी वायरच्या मदतीने महेशची हत्या केली. 9 ऑगस्ट रोजी दुपारी 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास महेशची हत्या करण्यात आली. महेश बेशुद्ध पडल्याचं वाटल्याने त्यांनी त्याला रुग्णालयात नेलं. मात्र तिथे त्याचा मृत्यू झाल्यानंतर सायंकाळी पोलिसांना या साऱ्या प्रकाराची माहिती मिळाली.
पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
तेजस्विनीने पहिल्यांदा पोलिसांना चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीनुसार, महेश हा तिच्याशी बारीकसारीक कारणांवरुन भांडायचा. अशाच एका भांडणादरम्यान आपण अंगावर धावून आलेल्या महेशला दूर ढकललं आणि तो खाली पडल्याने बेशुद्ध झाल्याचा दावा तेजस्विनीने पोलिसांच्या चौकशीदरम्यान केला.
कसा झाला उलडगा?
तेजस्विनीच्या बोलण्यावर पोलिसांना विश्वास बसला नाही कारण महेशच्या गळ्यावर दोरीसारखे व्रण आढळून आले. पोलिसांनी पुन्हा एकदा तेजस्विनीची कसून चौकशी केल्यानंतर तेजस्विनी आणि तिच्या प्रियकराने मिळून महेशला संपवल्याचं उघड झालं. पोलिसांना तेजस्विनीचा प्रियकर गजेंद्रलाही अटक केली आहे.
मुलासमोरच पत्नीने पतीला संपवलं?
महेशच्या मुलासमोरच त्याची त्याच्या पत्नीने आणि प्रियकराने हत्या केल्याचं पोलिसांकडे महेशच्या भावाने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. अनेक वर्षांपूर्वी महेश आणि तेजस्विनीचं लग्न झालं होतं. हे लव्ह मॅरेज होतं. कॉलेजच्या काळात हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. या दोघांना दोन मुलं असून मोठ्या मुलाचं वय 14 असून त्यांना 8 वर्षांची मुलगीही आहे.
तपास सुरु
पोलिसांनी या प्रकरणामध्ये हत्येचा गुन्हा दाखल केला असून नेमका घटनाक्रम काय आहे यासंदर्भात सध्या ते आरोपींचा चौकशी करत आहे. मात्र पत्नीनेच पतीला संपवल्याची बातमी सध्या येथे चर्चेचा विषय ठरत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.