पोर्न पाहून अल्पवयीन भावाकडून चिमुरडीवर बलात्कार: मग आईसमोरच गळा दाबून हत्या
मध्य प्रदेशातील रीवा येथे भयंकर घटना उघडकीस आली आहे. पॉर्न पाहून 13 वर्षाच्या भावाने 9 वर्षाच्या बहिणीवर बलात्कार केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. बलात्कारानंतर मुलाने बहिणीची गळा आवळून हत्या केली. या प्रकरणात आता मोठा खुलासा झाला आहे. मुलाने बहिणीची आईसमोरच हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. शिवाय आईसह दोन मोठ्या बहिणींनीही भावाचा गुन्हा लपवण्यासाठी आईला मदत केली. पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेतले आहे.
काय आहे प्रकरण?
‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या माहितीनुसार, 24 एप्रिल रोजी पीडित मुलीचा मृतदेह कुटुंबीयांना ती झोपली त्या ठिकाणी आढळला होता. त्यावेळी मुलीचा विषारी कीटक चावल्याने मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला होता. त्यांनी मुलीला खासगी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी मृतदेह घेण्यास नकार दिल्याने कुटंबीयांनी मृतदेह सरकारी रुग्णालयात नेला. सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर बलात्कार आणि हत्येची बाब उघडकीस आली.
यानंतर पोलिसांनी सदर प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलिसांना घटनास्थळी बाहेरुन कुणी आल्यासंदर्भातले कोणतेही पुरावे आढळले नाहीत. तसेच घरच्यांनीही कोणताही आवाज ऐकला नसल्याचे सांगितले. तांत्रिक पुरावे आणि 50 लोकांची चौकशी केल्यानंतर पोलिसांना कुटुंबीय वारंवार जबाब बदलत असल्याचे जाणवले. यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं?
आरोपी 13 वर्षाचा मुलगा आणि पीडिता शेजारी शेजारी झोपले होते. आरोपी मुलाने रात्री मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ पाहिला. त्यानंतर त्याने शेजारी झोपलेल्या बहिणीवर बलात्कार केला. यानंतर पीडितेने वडिलांना याबाबत सांगण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या मुलाने पीडितेचा गळा आवळला. यानंतर त्याने आईला उठवून याबाबत माहिती दिली. मात्र मुलगी जिवंत असल्याचे लक्षात येताच आईसमोर पुन्हा त्याने तिचा गळा आवळला.
आरोपीला 17 आणि 18 वर्षाच्या दोन मोठ्या बहिणी आहेत. भावाला वाचवण्यासाठी बहिणींनीही आईला साथ दिली. मोठ्या बहिणींनी बेडवरील रक्ताचे डाग नष्ट करुन पुरावाच नाहिसा केला. पोलिसांनी आई आणि दोन मोठ्या बहिणींसह आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे. आरोपींविरोधात कडक कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.