लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर उत्तर प्रदेश भाजपमध्ये सर्व काही आलबेल नाही. निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंत्रिमंडळाची पहिली बैठक बोलावली. या बैठकीला उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक हे दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर राहिले होते.
मात्र, भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी मुख्यमंत्री यांच्याविरोधातच रणशिंग फुंकले. त्यामुळे हे प्रकरण दिल्लीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोर्टात पोहोचले. दिल्लीच्या हस्तक्षेपानंतरही दोन्ही उपमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सन्मानाला धक्का लावण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशातच उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे.
14 जुलै रोजी लखनऊमध्ये भाजप कार्यकारिणीची बैठक झाली. त्यांनतर उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या राजकीय घडामोडींना सुरवात झाली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांनी खुले आव्हान दिले आहे. केशव प्रसाद मौर्य यांनी गेल्या 10 दिवसांत सुमारे 43 आमदार, दोन खासदार आणि सुमारे 10 मंत्र्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पदाधिकारीही त्यांना भेटत आहेत.विशेष म्हणजे दोन बलाढ्य नेत्यांमध्ये सत्तासंघर्ष सुरू असताना आमदार आणि मंत्री मात्र उघडपणे कोणत्याही गटाची बाजू घेत नाहीत. परंतु, हे सर्व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधातील बंडाची चाहूल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांचे हे बंड केवळ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात आहे मात्र पक्ष सोडण्याच्या तयारीत नाहीत हे विशेष.उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या घरी दररोज आमदार आणि मंत्र्यांचा मेळावा होत आहे. राज्याशी संबंधित कामातही ते मुख्यमंत्री योगी यांना टॅग करत नाहीत. मात्र, जे आमदार, मंत्री त्यांना भेटण्यासाठी येत आहेत त्यांचे फोटो सेशन होत आहे. पक्षातील किती लोक आपल्यासोबत आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न मौर्य करत आहेत असा याचा अर्थ आहे. परंतु, हे शक्तीप्रदर्शन केंद्राला दाखविण्यासाठी आहे की योगी आदित्यनाथ यांच्यासाठी आहे याचा मात्र अंदाज लागत नाही.
उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्याकडे जे आमदार आले होते. ते त्यांच्यासोबतच असतील असे नाही. कारण, संधी मिळाल्यास हे आमदार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही बाजू घेण्याची शक्यता आहे. ज्याप्रमाणे हे आमदार केशव प्रसाद मौर्य यांना भेटण्यास गेले होते त्याचप्रमाणे त्यांनी सीएम योगी यांचीही त्यांच्या कार्यालयात भेट घेतली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.