सांगली : सांगली शहरातून दुचाकी चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली आहे. विश्रामबाग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई केली. इम्रान अल्लाबक्ष शेख (वय ३५, रा. मांजरी, जि. बेळगाव), सरफराज शहानवाज शेख (वय ३०, रा. शंभर फुटी रोड, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. २५ जुलै रोजी शहरातील कॉलेज कॉर्नर परिसरातून सुहास मदीहळ्ळी यांची दुचाकी अज्ञातांनी चोरून नेली होती. याप्रकरणी त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. विश्रामबागचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक चोरट्यांच्या शोधात होते.
त्यावेळी इम्रान शेख, सरफराज शेख यांनी दुचाकी चोरल्या असून ते पुष्पराज चौक परिसरात थांबल्याची माहिती संकेत कानडे, आर्यन देशिंगकर, प्रशांत माळी यांना खबऱ्याद्वारे मिळाली. त्यांनी पुष्पराज चौक परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्याकडील दुचाकी जप्त करून त्यांना अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्या मार्गदर्शनाने संदीप साळुंखे, बिरोबा नरळे, संकेत कानडे, आर्यन देशिंगकर, प्रशांत माळी, योगेश पाटील, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.